केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी प्रमुख के. व्ही. चौधरी यांची केंद्रीय दक्षता आयुक्तपदी, तर माहिती आयुक्त विजय शर्मा यांची मुख्य माहिती आयुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. गेले नऊ महिने ही पदे रिक्त असल्याने काँग्रेस पक्षाने सरकारचा कारभार पारदर्शक नसल्याची टीका केली होती.
इंडियन बँकेचे अध्यक्ष टी. एम. भसीन यांना दक्षता आयुक्त नेमण्यात आले असून माजी सामाजिक न्याय व सक्षमीकरण आयुक्त सुधीर भार्गव यांना माहिती आयुक्त नेमण्यात आले आहे. या नियुक्तयांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी मंजुरी दिली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खारगे यांनीही चौधरी व शर्मा यांच्या नावाला मान्यता दिली होती.
के. व्ही. चौधरी- चौधरी यांची नेमणूक केल्याने मुख्य दक्षता आयुक्तपदी प्रथमच आयएएस व्यतिरिक्त अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. चौधरी हे आयआरएस म्हणजे भारतीय महसूल सेवेचे अधिकारी असून ते सर्वोच्च न्यायालयाने काळ्या पैशाबाबत नेमलेल्या विशेष चौकशी पथकाचे सल्लागार होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून ते ऑक्टोबरमध्ये निवृत्त झाले. शर्मा हे माजी पर्यावरण सचिव असून २०१२ पासून माहिती आयुक्त म्हणून काम करीत होते. त्यांना सहा महिने कालावधी मिळणार असून ते १ डिसेंबरला वयाची ६५ वर्षे पूर्ण करीत असल्याने निवृत्त होतील. चौधरी व भसीन यांची चार वर्षांसाठी नियुक्ती असली तरी ६५ वर्षे हे निवृत्तीचे वय लागू राहणार आहे. भार्गव यांना चार वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: K v chowdary as central vigilance commissioner vijay sharma new cic
First published on: 09-06-2015 at 01:49 IST