मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ हे काँग्रेसला रामराम करून भारतीय जनता पार्टीत सामील होतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहे. कमलनाथ आणि त्यांचे पूत्र नकुलनाथ हे काँग्रेस पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन कमलनाथ कुठेही जात नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर दोन दिवसांपूर्वी कमलनाथ यांनीदेखील माझ्याबद्दल अफवा पसरवू नका असं म्हणत प्रसारमाध्यमांना सज्जड दम दिला. त्यापाठोपाठ आता कमलनाथ यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
कमलनाथ बुधवारी छिंदवाडा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, मी स्वतःला तुमच्यावर लादणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर मी पक्ष सोडण्यास तयार आहे. मला गेल्या अनेक वर्षांपासून कार्यकर्त्यांकडून खूप प्रेम आणि विश्वास मिळला आहे. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांसाठी काम करत राहीन.
कमलनाथ हे त्यांचा बालेकिल्ला असलेल्या छिंदवाडामधील हर्रई येथील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत सहभागी झाले होते. यावेळी कमलनाथ कार्यकर्ते आणि समर्थकांना उद्देशून म्हणाले, तुम्ही जर मला निरोप देणार असेल तर ही तुमची मर्जी असेल. मी जाण्यासाठी तयार आहे. मी स्वतःला तुमच्यावर लादणार नाही. शेवटी तुम्हाला काय वाटतं, तुमच्या मनात काय आहे ते महत्त्वाचं आहे.
हे ही वाचा >> हिमाचलमध्ये राजकीय उलथापालथ चालूच! काँग्रेसचे ‘ते’ सहा आमदार अपात्र, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; कारण काय?
कमलनाथ यांचे पूत्र नकुलनाथ हे छिंदवाडाचे खासदार आहेत. नकुलनाथ यंदा पुन्हा एकदा छिंदवाडामधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे कमलनाथ काँग्रेस आणि त्यांच्या मुलाच्या प्रचाराच्या कामात गुंतले आहेत. तसेच या मतदारसंघात काँग्रेसची मोर्चेबांधणी करत आहेत. कमलनाथ यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना म्हणाले, आपले विरोधक म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे लोक खूप आक्रमक होऊन देशभर प्रचार करत आहेत. परंतु, तुम्ही त्यांना घाबरू नका. आपणही तितकीच मेहनत करू. आपल्याला लोकांचं भविष्य सुधारण्यासाठी आणि सुरक्षित करण्यासाठी एकेक मत सुनिश्चित करावं लागेल. आपण हे सगळं करू शकतो. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे.