शेतकरी आंदोलनाच्या मुद्यावरुन अभिनेत्री कंगना रणौतने पुन्हा एकदा अभिनेता दिलजीत दोसांझला लक्ष्य केले आहे. प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहानाने दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ टि्वट केल्यापासून पुन्हा एकदा वातावरण ढवळून निघाले आहे. रिहानाच्या टि्वटनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरुन या आंदोलनाला पाठिंबा मिळू लागला आहे. बॉलिवूडमधील काही कलाकारांना रिहानाचे मत पटलेले नाही, या मुद्यावरुन दोन गट पडतील असे चित्र आहे.

दिलजीत दोसांझने RiRi हे गाणे रिहानाला समर्पित केले आहे. त्यावरुन कंगनाने दिलजीतला प्रश्न विचारला आहे. कंगनाने सुरुवातीपासून शेतकरी आंदोलना विरोधात भूमिका घेतली आहे.

“याला पण आपले दोन रुपये बनवायचे आहेत, याची प्लानिंग कधीपासून सुरु होती? व्हिडिओ बनवायला आणि नंतर घोषणा करायला, कमीत कमी एक महिना तर लागेल आणि हे सर्व ऑर्गेनिक आहे, यावर आपण विश्वास ठेवावा, अशी त्यांची इच्छा आहे” असे कंगनाने तिच्या टि्वटमध्ये म्हटले आहे. #Indiatogether #IndiaAgainstPropoganda असे हॅशटॅगही तिने दिले आहेत.

कंगनाच्या या दोन रुपयाच्या टि्वटला दिलजीतने उत्तर दिले आहे. “मला माझे काम शिकवू नको. मी अर्ध्या तासात गाणे बनवू शकतो. तुझ्यावर गाण बनवण्याची माझी इच्छा नाही. पण त्यासाठी मला दोन मिनिटं लागतील. मला त्रास देऊ नको, तू जाऊन तुझं काम कर” असं दिलजीतने म्हटलं आहे.

दिलजीतच्या त्या टि्वटला कंगनाने पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. मी देशभक्त असून दिलजीतला त्याच्या योजनेत यशस्वी होऊ देणार नाही असे तिने म्हटलं आहे. “माझ एकच काम आहे देशभक्ती. तेच मी दिवसभर करत असते. मी तेच करत राहणार. पण खलिस्तानी तुला तुझं काम करु देणार नाही” असे कंगनाने म्हटले आहे.