आम आदमी पक्षातील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. अरविंद केजरीवाल यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी केलेल्या कपिल मिश्रा यांनी रविवारी केजरीवालांवर गंभीर आरोप केले आहेत. दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन यांनी माझ्यासमक्ष अरविंद केजरीवाल यांना दोन कोटी रुपये दिले होते असा आरोप त्यांनी केला आहे. हे पैसे कुठून आले आणि कशासाठी देण्यात आले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे.

शनिवारी दिल्लीतील मंत्रिमंडळातून कपिल मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर रविवारी आपण गौप्यस्फोट करु अशा आशयाचे ट्विट कपिल मिश्रांनी केले होते. रविवारी सकाळी कपिल मिश्रा यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली. यानंतर कपिल मिश्रा यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केजरीवाल यांच्यावर आरोप केले.

‘परवा रात्री दिल्लीचे मंत्री सत्येंद्र जैन यांनी अरविंद केजरीवाल यांना माझ्यासमोर दोन कोटी रुपये दिले. हा प्रकार बघून मला रात्रभर झोप आली नाही’ असे कपिल मिश्रांनी सांगितले. मी हे पैसे कशासाठी दिले याची विचारणा केजरीवालांकडे केली. पण त्यांनी यावर ठोस उत्तर देणे टाळले असा दावा त्यांनी केला.

सत्येंद्र जैन यांनी काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांच्या नातेवाईकासाठी ५० कोटी रुपयांचा जमीन व्यवहार केल्याचे सांगितले होते असा दावा मिश्रा यांनी केला आहे. मिश्रा यांनी पंजाब निवडणुकीत आपने केलेल्या खर्चावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘मला केजरीवाल हे स्वच्छ वाटायचे. ते कारवाई करतील अशी आशा होती. गेल्या दोन वर्षांपासून मी त्यांच्यावर याच आशेवर विश्वास ठेवला’ असे मिश्रा यांनी नमूद केले.
माझ्यावर यापूर्वीही पक्षाला कारवाई करता आली असती. पण आत्ताच का माझ्यावर कारवाई झाली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. टँकर घोटाळ्याप्रकरणी मला आत्तापर्यंत मिळालेली सर्व माहिती मी तपास यंत्रणांना द्यायला तयार आहे. मी शीला दीक्षित यांच्याविरोधात अहवाल दिला होता. पण त्याचे पुढे काय झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.  दिल्लीतील मंत्री सत्येंद्र जैन हे वादग्रस्त मंत्री म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी सीबीआयने सत्येंद्र जैनविरोधात आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.