दिल्लीतील उत्तम नगरमध्ये एका ३६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू सुरूवातीला अपघाती झाल्याचे समोर आले. वीजेचा झटका लागून मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. मात्र आता त्याची पत्नी आणि चुलत भाऊ यांच्यातील चॅट्स व्हायरल झाल्यानंतर ही हत्या असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी मृत व्यक्तीची पत्नी, तिचा प्रियकर आणि मृत व्यक्तीचा चुलत भाऊ अशा तिघांना अटक केली आहे.

१३ जुलै रोजी सकाळी दिल्लीतील जनकपुरी भागातील एका रूग्णालयात पीडित करण देव याला मृत घोषित करण्यात आलं. त्यावेळी त्याची पत्नी सुष्मिताने घरी अपघाती विजेचा झटका बसला असे सांगितले. कुटुंबाने हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे मानून शवविच्छेदन करण्यास नकार दिला. पीडित व्यक्तीचे वय कमी असल्याने आणि त्याच्या मृत्यूसंबंधित परिस्थिती पाहता पोलिसांनी शवविच्छेदन करण्याचा आग्र धरला. मृतदेह शविविच्छेदन तपासणीसाठी हरिनगर इथल्या दीनदयाळ उपाध्याय रूग्णालयात पाठवण्यात आला.

काही दिवसांनंतर इन्स्टाग्रामवरून मिळालेल्या संभाषणाने पोलीस तपासाची दिशाच बदलली. पीडित व्यक्तीचा धाकटा भाऊ कुणाल देव याला सुष्मिता आणि करणचा चुलत भाऊ राहुल यांच्यातील एक चॅट सापडले. त्यामुळे हा नैसर्गिक मृत्यू नसून हत्येचा कट असल्याचे उघड झाले. कुणालने हे संभाषण १६ जुलै रोजी पोलिसांकडे सादर केले.

१२ जुलैच्या रात्री आरोपीने करणच्या जेवणात १५ झोपेच्या गोळ्या मिसळल्याचे या चॅटमधून उघड झाले. या गोळ्यांचा त्वरित परिणाम करणवर झाला नाही तेव्हा सुष्मिता घाबरली. तिने राहुलला मेसेज करून सांगितले की, “औषध घेतल्यानंतर मृत्यू होण्यास किती वेळ लागतो ते एकदा बघ. त्याला जेवून तीन तास झाले. उलट्या नाही, काही नाही. आणि अजून मृत्यूही नाही. मग आपण काय करायचे, काहीतरी सुचवा.”
त्यावर राहुलने उत्तर दिले, “जर तुम्हाला काही कळत नसेल तर त्याला शॉक द्या.”
मग सुष्मिताने विचारले, “त्याला शॉकसाठी बांधायचे कसे?”
राहुल म्हणाला, “टेपसह”
सुष्मिता म्हणाली, “तो खूप हळू श्वास घेत आहे”
राहुल म्हणाला, “तुमच्याकडे असलेली सर्व औषधे त्याला द्या”
त्यावर सुष्मिता म्हणाली, “मी त्याचे तोंड उघडू शकत नाही. मी पाणी ओतू शकते, पण मी औषध देऊ शकत नाही. तू इथे ये, कदाचित आपण मिळून ते खायला देऊ शकतो.”

पोलिसांच्या म्हणण्यांनुसार, आरोपींनी करणला शांत केल्यानंतर विजेचा झटका देऊन त्याचा मृत्यू अपघाती असल्याचे भासवले. झोपेच्या गोळ्यांमुळे तो लगेच बेशुद्ध झाला नाही. तेव्हा त्यांनी त्याला शांत असतानाच त्याच्या बोटाला वीजेचा शॉक देण्याचा निर्णय घेतला. करणचा मृत्यू झाल्यानंतर सुष्मिता जवळच तिच्या सासरच्या घरी गेली आणि त्यांना सांगितले की करणला विजेचा झटका लागला. कुटुंबीयांनी तातडीने घरात जाऊन त्याला रूग्णालयात नेले, मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

त्यानंतर करणच्या चुलत भावाने त्याच्या शवविच्छेदनाला तीव्र विरोध केला. मात्र विरोध असूनही नियम आणि तरूणाच्या अनैसर्गिक मृत्यूबाबतच्या संशयामुळे पोलिसांनी शवविच्छेदन प्रक्रिया करण्यास सांगितले.

१६ जुलै रोजी कुणालने चॅटचे पुरावे सादर केले आणि सुष्मिता, तिचा प्रियकर आणि करणचा चुलत भाऊ यांना अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुष्मिताने तिच्या कबुलीजबाबात सांगितले की करवा चौथच्या आदल्या दिवशी करणने तिला कानाखाली मारली होती. तसंच तिला शिवीगाळ केली आणि अनेकदा पैशांची मागणीही केली होती.