जमिनीचे संपादन रद्द करण्याच्या प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर भाजप नेते कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी आणखी १० दिवसांची मुदत मागितली आहे. त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागासमोर (एसीबी) हजर राहावे लागणार आहे.

मुख्यमंत्री असताना जमीन संपादन बेकायदा रद्द करण्याचा निर्णय त्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात दोन एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. चौकशीला सामोरे जाण्यासाठी त्यांची तयारी दिसून येत नाही. त्यामुळेच त्यांनी एसीबीकडे प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी १० दिवसांची मुदत देण्याची विनंती केली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व पुरावे, कागदपत्रे गोळा करून ते मांडण्यासाठी मला ही मुदत हवी आहे. त्यासाठी एसीबीकडे विनंती केली आहे. मुदत मिळाल्यास मला माझी बाजू योग्यरितीने मांडता येऊ शकेल, असे त्यांनी एसीबीला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

गृहनिर्माण वसाहतीसाठी काही हजार एकर जमिनीच्या संपादनाची नोटीस जारी झाली होती. परंतु मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यापैकी २५७ एकरचे संपादन रद्दबातल ठरवणारे आदेश जारी केले होते. ही प्रक्रिया बेकायदा होती, असा आरोप लावण्यात आला आहे.