पूर्व दिल्लीतील कडकडडूमा मेट्रो स्टेशनवर स्वतःच्या पत्नीवर गोळ्या झाडून तिला ठार मारणाऱया पतीने बुधवारी उत्तर प्रदेशातील मुरादनगरमध्ये आत्महत्या केली.
मुरादनगर रेल्वे स्थानकाजवळील एका झाडाच्या साह्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. पवन असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याने मंगळवारी दुपारी मेट्रो स्थानकावर आपली पत्नी दीप्ती आणि तिचे वडील बिशमदास यांच्यावर गोळीबार केला होता. गोळीबारामध्ये दीप्ती मृत्युमुखी पडली, तर तिचे वडील जखमी झाले होते. त्यानंतर पवन घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनास्थळावरून पळून जाताना पवनने आपल्याकडील पिस्तूल तिथेच फेकून दिली होती. ती पोलिसांनी ताब्यात घेतली. पवनचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दिल्ली पोलिसांचे पथक मुरादाबादकडे गेले आहे.