कर्नाटकमध्ये अचंबित करणारा प्रकार समोर आला आहे. बागलकोटमधील हनागल येथील श्री कुमारेश्वर रुग्णालय आणि रिसर्च सेंटरच्या डॉक्टरांनी एका रुग्णाच्या पोटातून तब्बल १८७ नाणी काढली आहेत. उलटी आणि पोटदुखीचा त्रास होत असल्यामुळे या रुग्णाने रुग्णालयात धाव घेतली होती. मात्र तपासणी केल्यावर या रुग्णाच्या पोटात १८७ नाणी असल्याचे समोर आले. शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी ही सर्व नाणी पोटातून बाहेर काढली आहेत.

नेमका प्रकार काय?

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार बागलकोटमधील एका व्यक्तीच्या पोटातून १८७ नाणी बाहेर काढण्यात आली आहेत. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे नाणी गिळलेली व्यक्ती ही मनोरुग्ण आहे. मागील २ ते ३ महिन्यांपासून हा रुग्ण नाणी गिळत होता. मात्र पोटात बरीच नाणी साचल्यानंतर त्याला पोटदुखी आणि उलटीचा त्रास सुरू झाला. परिणामी त्याने श्री कुमारेश्वर रुग्णालय आणि रिसर्च सेंटरकडे धाव घेतली. या व्यक्तीची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याच्या पोटात नाणी आढळली. त्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून ही सर्व नाणी बाहेर काढली आहेत. शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांच्या चमुपैकी डॉक्टर इश्वर कलबुर्गी यांनी ही माहिती दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या घटनेनंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तब्बल १८७ नाणी पोटात घेऊन ही व्यक्ती जिवंत कशी राहिली, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सध्या या रुग्णावर उपचार सुरू असून तो डॉक्टरांच्या निगराणीखाली आहे.