कावेरीचे पाणी तमिळनाडूला सोडण्याच्या निषेधार्थ कन्नड समर्थक संघटनांनी कर्नाटकात राज्यव्यापी बंद पुकारला आहे. सकाळी ६ वाजता हा बंद सुरू झाला असून कन्नड समर्थकांनी वेगवेगळ्या ठिकाणी निषेध आणि घोषणाबाजी केली आहे. तर, राज्याच्या विविध भागातून विविध संघटनांच्या २०० हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

बंद दरम्यान केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल ४४ उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. आंदोलकांनी विमानतळावर घोषणाबाजी केल्याने गोंधळ उडाला होता, त्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर, दुसरीकडे राज्यातील वाहतूक सेवाही खंडीत झाली असून हॉटेल आणि इतर सुविधाही बंद ठेवण्यात आले आहेत.

कर्नाटकची राजधानी बेंगळुरूत बंदसाठी पोलिसांनी परवानगी नाकारली असून शनिवारपर्यंत १४४ कलम अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर, अनेक जिल्ह्यांमध्ये शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. सर्व दुकाने, मॉल्स आणि इतर व्यावसायिक प्रतिष्ठानेही बंद ठेवम्यात आली आहेत. चित्रपटगृहांतही शुकशुकाट आहे. तसंच, कन्नड समर्थक संघटनांनी महामार्ग आणि टोलनाकेही रोखले.

कर्नाटकात बंद का?

कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरण (CWMA) आणि त्याची सहाय्यक संस्था कावेरी जल नियमन समिती (CWRC) च्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे कावेरी जल नियमन समितीने १५ ऑक्टोबरपर्यंत तमिळनाडूला प्रतिसेकंद तीन हजार क्युसेक पाणी सोडण्याचे निर्देश कर्नाटक सरकारला दिले. या निर्देशाविरोधात कन्नडी समर्थक संघटना आक्रमक झाल्या आहेत. दरम्यान, या निर्देशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची भूमिका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केली.

बंदमध्ये कोण कोण सहभागी?

कर्नाटक रक्षण वेदिके, कन्नड चालवली (वताल पक्ष) आणि विविध शेतकरी संघटनांच्या गटांसह कन्नड संघटनांसाठी असलेल्या कन्नड ओक्कुटा या संघटनेने राज्यव्यापी बंद पुकारला आहे. भाजप आणि जेडीएसनेही बंदला पाठिंबा दिला आहे. ऑटोरिक्षा ड्रायव्हर्स युनियन आणि ओला उबर ड्रायव्हर्स अँड ओनर्स असोसिएशन (OUDOA) या बंदला पाठिंबा देत आहेत. ब्रुहथ बंगळुरू हॉटेल असोसिएशन आणि कर्नाटक स्टेट प्रायव्हेट स्कूल्स असोसिएशनसह इतरांनीही पाठिंबा जाहीर केला आहे.

या सेवा सुरळीत

दरम्यान, बेंगळुरू मेट्रो रेल्वे कार्यरत असून राज्य परिवहन विभागानेही राज्य परिवहन महामंडळांना सेवा सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर, बँका, रुग्णालयेही कार्यरत आहेत.तसंच सरकारी कार्यालये देखील कार्यरत आहेत. तमिळनाडूच्या सीमा असलेल्या कर्नाटकातील जिल्ह्यांना बंदच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.