Karnataka Bus Driver Namaz Controversy: कर्नाटकमध्ये एका बस चालकाने ड्युटीवर असताना नमाज पठण केल्यामुळे त्याला कारवाईला सामोरे जावे लागले आहे. नॉर्थ वेस्टर्न कर्नाटक रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NWKRTC) च्या बसचा चालक ए. आर. मुल्ला याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी सायंकाळी विशालगड ते हनगल या मार्गावर चालणाऱ्या बसच्या चालकाने हुबळीच्या बाहेर गट्टूर नाक्यावर बस थांबवून नमाज अदा केली होती. नमाज पठण करतानाचा कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंरत याविरोधात अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती.

हावेरी विभागाच्या विभागीय सुरक्षा अधीक्षकांनी सादर केलेल्या अहवालानुसार, चालक ए. आर. मुल्ला प्रवाशी बस चालवत होता. मुल्लाने मंगळवारी रस्त्यात बस थांबवून चालकाच्या मागच्या सीटवर नमाज अदा केली. चालकाची सदर कृती कर्तव्यात कसूर असल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे.

आचारसंहिता आणि शिस्तपालन नियमांच्या आधारावर चालक मुल्ला याचे निलंबन करण्यात आले आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत चालकाला तात्काळ निलंबित करण्यात यावे, असे या अहवालात म्हटले गेले. निलंबित असताना चालकाला त्याच्या एकूण वेतनाच्या केवळ ५० टक्के वेतन मिळेल. तसेच यात दैनिक भत्ता वगळता इतर भत्ते असतील.

कर्नाटकचे वाहतूक मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी या कारवाईवर भाष्य करताना सदर प्रकरणाची सखोल चौकशी होणार असल्याचे म्हटले. तसेच NWKRTC च्या व्यवस्थापकीय संचालकांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी सरकरी कर्मचाऱ्यांना कायदे आणि नियमांचे शिस्तीत पालन केले पाहीजे, असे म्हटले.

प्रत्येकाला धर्म पाळण्याचा अधिकार पण…

वाहतूक मंत्री रामलिंगा रेड्डी पुढे म्हणाले, प्रत्येकाला धर्म पाळण्याचा अधिकार असला तरी कार्यालयीन काम पूर्ण झाल्यानंतर त्यांनी धर्म पाळावा. प्रवासादरम्यान प्रवाशांनी भरलेली बस थांबवणे चुकीचे आहे. चालक दोषी आढळल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना राबिवल्या जातील, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.