गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपचालू असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यात दोन्ही बाजूंच्या नेतेमंडळी आणि आमदारांकडूनही एकमेकांवर टीका करताना पातळी सोडल्याचीही अनेक उदाहरणं दिसून आली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण खालच्या पातळीवर जात असल्यची टीकाही केली जात असताना आता कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी केलेल्या एका विधानावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हरिप्रसाद यांनी पक्षांतर करणाऱ्या आमदारांची तुलना अप्रत्यक्षपणे देहविक्री करणाऱ्या महिलांशी केल्याचं बोललं जात आहे.
नेमकं काय घडलं?
कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीकडून होसीपेटच्या डॉ. पुनीत रादकुमार स्टेडियमवर आयोजित केलेल्या सभेमध्ये हरिप्रसाद यांनी सत्ताधारी भाजपावर आणि भाजपामध्ये गेलेल्या काँग्रेस आमदारांवर परखड शब्दांत टीका केली. मात्र, असं करताना त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी या आमदारांना उद्देशून एक विधान केलं. या विधानामुळे आता वाद होऊ लागला आहे.
काय म्हणाले हरिप्रसाद?
“जेव्हा जनता कुठल्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत देत नाही, तेव्हा आम्ही राजकीय पक्ष आघाडीचं सरकार स्थापन करतो. पण आपल्या उदरनिर्वाहासाठी देहविक्री करणाऱ्या महिलांना आपण वेगवेगळी नावं देतो. त्यांना आपण वेश्याही म्हणतो. पण आता स्वत:ला विकणाऱ्या आमदारांना काय म्हणायचं, हे मी तुमच्यावर (जनतेवर) सोपवतो. इथल्या स्थानिक आमदारांना चांगला धडा शिकवा”, असं हरिप्रसाद आपल्या भाषणात म्हणाले आहेत. असं बोलताना त्यांचा रोख स्थानिक आमदार आणि राज्याचे पर्यटन मंत्री आनंद सिंह यांच्या दिशेने असल्याचं सांगितलं जात आहे.
सत्ताधाऱ्यांच्या दणक्यानंतर तमिळनाडूच्या राज्यपालांची माघार
दरम्यान, या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर त्यांना याबाबत माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची भूमिका मांडली. “भाजपानं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला. देहविक्री करणाऱ्या महिलांविषयी विनाकारण वाद निर्माण केला जात आहे. आमच्या मनात या महिलांविषयी अतीव आदर आहे. जर माझ्या विधानामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील, तर मी त्यांची माफी मागतो”, अशी प्रतिक्रिया हरिप्रसाद यांनी दिली.
यासंदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना विचारणा केली असता, “इतक्या खालच्या स्तरावरील वक्तव्यावर मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही, हीच माझी त्यावर प्रतिक्रिया आहे”, असं ते म्हणाले.