गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकात सुरु असलेल्या राजकीय नाटयावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. काँग्रेस-जेडीएसच्या काही आमदारांनी बंडखोरी करुन राजीनामे दिल्यामुळे कर्नाटकात राजकीय संकट निर्माण झाले आहे.मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या सरकारची आज परीक्षा असून विधानसभेत त्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आहे. संख्याबळाचा आकडा भाजपाच्या बाजूने असताना सरकार टिकवण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे.

मी आघाडी सरकार चालवू शकतो कि, नाही यासाठी मी फक्त इथे आलेलो नाही. काही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांनाच अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असे कुमारस्वामी म्हणाले. आमच्यावर आधारहीन आरोप लावण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या आदेशात काय म्हटले आहे त्यावर चर्चा करायची नाही असे कुमारस्वामी म्हणाले

२२५ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेत काँग्रेस-जेडीएस आणि बसपाचा एक आमदार मिळून सत्ताधाऱ्यांचे संख्याबळ ११७ आहे. दोन अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने भाजपाचे संख्याबळ १०७ आहे. विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांचे राजीनामे स्वीकारले किंवा ते अनुपस्थित राहिले तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारांची संख्या १०१ वर येईल. अशा परिस्थितीत येडियुरप्पा बहुमत सिद्ध करुन सत्ता स्थापनेचा दावा करु शकतात.

राजीनामा देणाऱ्या आमदारांना तुम्ही विधानसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी भाग पाडू शकत नाही हे सर्वोच्च न्यायलयाने बुधवारीच स्पष्ट केले आहे.