कर्नाटकात अनेक दिवसांच्या राजकीय नाट्यावर अखेर मंगळवारी पडदा पडला. कर्नाटका विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यास मुख्यमंत्री कुमारस्वामी अपयशी ठरले आणि पुन्हा एकदा भाजपाचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर अनेक दिग्गज नेत्यांकडून निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा नेते आणि केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्यार अब्बार नक्वी यांनी कर्नाटकातील राजकीय परिस्थितीवर प्रतिक्रिया देत ‘जो जिता वही सिकंदर’ असल्याचे म्हणत काँग्रेस-जेडीएसला डिवचले.
कर्नाटकात स्थापन करण्यात आलेले काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार म्हणजे ‘जुगाड’ असल्याची टिका नक्वी यांनी केली. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेसवरही निशाणा साधला. आतापर्यंत काँग्रेसने जे काही केले ती लोकशाही होती का? असा सवालही त्यांनी केला. काँग्रेस-जेडीएस सत्ताधारी आघाडीतील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर अनेक दिवस लांबलेल्या शक्तिपरीक्षेत एच. डी. कुमारस्वामी सरकारचा पराभव झाला. विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने ९९, तर विरोधात १०५ मते पडल्याने कुमारस्वामी सरकार कोसळले असून, भाजपचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
सत्ताधारी काँग्रेस-जेडीएस आघाडीतील १६ आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर कुमारस्वामी सरकार अडचणीत आले होते. सरकार वाचविण्यासाठी आघाडीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुंबईत तळ ठोकलेल्या १३ बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही सत्ताधाऱ्यांनी केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले. अखेर कुमारस्वामी यांनी गेल्या गुरुवारी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला. मात्र, राज्यपाल वजुभाई वाला यांनी ठरावावरील मतदानासाठी दिलेल्या दोन मुदती सत्ताधाऱ्यांना पाळता आल्या नाहीत.
अखेर विधानसभा अध्यक्ष रमेशकुमार यांनी मंगळवारी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेतले. ‘काँग्रेस-जेडीएस सत्ताधारी आघाडीला ९९ मते मिळाली, तर विरोधी पारडय़ात १०५ मते पडली. कुमारस्वामी सरकार विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्यात अपयशी ठरले आहे,’ अशी घोषणा रमेशकुमार यांनी केली.