तामिळनाडू , कर्नाटकमध्ये बलात्कार आणि हत्याच्या घटनांनी दहशत निर्माण करणाऱ्या ‘सायको शंकर’ने मंगळवारी तुरुंगात आत्महत्या केली. शिक्षा भोगत असताना सायको शंकरने दोन वेळा तुरुंगातून पलायन केले होते.

तामिळनाडू, कर्नाटकमध्ये २००८ ते २००९ या कालावधीत एम जयशंकर या सायको किलरने दहशतच निर्माण केली होती. ऑगस्ट २००९ मध्ये त्याने बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या महिला कॉन्स्टेबलचे अपहरण केले आणि बलात्कार करुन तिची हत्या केली. या प्रकरणानंतर तिरपूर पोलिसांनी आरोपीविरोधात शोधमोहीम राबवली व जयशंकर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलीस चौकशीत जयशंकरला यापूर्वी २००८ मध्ये संकरी पोलिसांनी देखील बलात्कार व हत्येच्या गुन्ह्यात अटक केल्याचे समोर आले. सखोल चौकशीनंतर त्याने १३ महिलांची बलात्कारानंतर हत्या केल्याचे उघड झाले आणि या प्रकरणावरुन देशभरात संतापाची लाट उसळली. तिरपूर, सालेम आणि धर्मपूरीत त्याने आणखी सात महिलांवर बलात्कार केल्याचेही उघड झाले. जयशंकरला कोईंबटूरमधील कारागृहात ठेवण्यात आले होते. मार्च २०११ मध्ये धर्मपुरीतील फास्ट ट्रॅक कोर्टात जयशंकरला सुनावणीसाठी नेण्यात आले होते. तिथून परतत असताना जयंशकरने पोलिसांना धक्का देऊन पळ काढला. या प्रकरणामुळे पोलिसांची नाचक्की झाली होती. एम. चिन्नसामी आणि राजावेलू हे पोलीस कॉन्स्टेबल त्याला घेऊन जात होते. या घटनेमुळे हताश झालेल्या चिन्नसामी यांनी आत्महत्या केली होती.

पोलिसांच्या कैदेतून पळाल्यावर त्याने कर्नाटकमध्ये दोन महिन्यात सहा महिलांची बलात्कारानंतर हत्या केली होती. तसेच एका पुरुषाची व मुलाची देखील त्याने हत्या केली. मे २०११ मध्ये पोलिसांनी बिजापूरमधून शंकरला अटक केली. एप्रिल २०१३ मध्ये त्याला हत्या व बलात्काराच्या एका प्रकऱणात १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. सप्टेंबर २०१३ मध्ये त्याने पुन्हा एकदा तुरुंगातून पळ काढला. मात्र, अवघ्या पाच दिवसांत त्याला बेंगळुरुतून अटक करण्यात पोलिसांना यश आले.

एम शंकर उर्फ जयशंकर हा ४१ वर्षांचा होता. तो मूळचा सालेम जिल्ह्यातील इदापद्दी गावातील रहिवासी होता. शंकरचे १२ वी पर्यंतचे शिक्षण झाले होते. ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत असताना तो तामिळ, कानडी व हिंदी भाषा शिकला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जयशंकरला बेंगळुरुजवळील एका कारागृहात ठेवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी जयशंकरने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. त्याने ब्लेडने स्वतःच्या गळा कापला. तुरुंगातील कैद्यांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेला जयशंकरचा मृतदेह बघितला. त्यांनी या घटनेची माहिती तुरुंग प्रशासनाला गेली.