Who is Zameer Ahmed Khan : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक मोठे निर्णय घेत पाकिस्तानची चहुबाजूने कोंडी केली आहे. पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवरही भारताने बंदी घातली आहे. त्यामुळे याचा फटका पाकिस्तानला बसण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असतानाच कर्नाटकचे गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक मंत्री बीझेड जमीर अहमद खान यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आलं आहे. मंत्री बी झेड जमीर अहमद खान यांनी आपण स्वत: सुसाईड बॉम्ब घेऊन पाकिस्तानात युद्धासाठी जाण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. या विधानामुळे ते चर्चेत आले आहेत.

मंत्री बीझेड जमीर अहमद खान काय म्हणाले होते?

एका पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री खान यांनी म्हटलं होतं की, “पाकिस्तान नेहमीच भारताचा शत्रू राहिला आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परवानगी दिली तर आपण युद्धाला जाण्यास तयार आहोत. आम्ही भारतीय आहोत, आम्ही हिंदुस्थानी आहोत. पाकिस्तानचे आपल्याबरोबर कधीही कसलेही संबंध नव्हते. पाकिस्तान आपला कायम शत्रू राहिला आहे. जर पंतप्रधान मोदी आणि अमित शाह अन् केंद्र सरकारने परवानगी दिली तर मी युद्धासाठी पाकिस्तानात जाण्यास तयार आहे”, असं विधान मंत्री बी झेड जमीर अहमद खान केलं होतं.

जमीर अहमद खान कोण आहेत?

बीझेड जमीर अहमद खान हे कर्नाटकातील ज्येष्ठ नेते आहेत. तसेच ते सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारमध्ये गृहनिर्माण आणि अल्पसंख्याक मंत्री आहेत. मंत्री खान हे कर्नाटक विधानसभेत चामराजपेट मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. माहितीनुसार, त्यांनी जनता दल (धर्मनिरपेक्ष) पासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू केला आणि २००५ मध्ये ते चामराजपेट येथून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी २०१८ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या वर्षी केंद्रीय मंत्री आणि जनता दल नेते एचडी कुमारस्वामी यांच्याविरुद्ध वर्णद्वेषी भाषा वापरल्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.