बंगळुरू येथील रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) आता मोठी कारवाई केली आहे. या बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह एकाला शुक्रवारी कोलकाता येथून ताब्यात घेतले आहे. बंगळुरू येथील रामेश्वर कॅफेमध्ये १ मार्च रोजी बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये जवळपास १० लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती.

रामेश्वर कॅफेमध्ये आरोपीने स्फोटकांनी भरलेली बॅग ठेवली होती. त्यानंतर आरोपी तेथून फरार झाला होता. या घटनेमुळे बंगळुरूमध्ये एकच खळबळ उडाली होती. यानंतर ३ मार्चला या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला होता. या बॉम्बस्फोट प्रकरणी सुरुवातीला पीएफआयशी संबंधित एकाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर साई प्रसाद नावाच्या एका भाजपा कार्यकर्त्याला एनआयएकडून अटक केल्याचे वृत्त समोर आले होते. या स्फोटाशी काही संबंध आहे का? याबद्दल चौकशी केली जात होती.

हेही वाचा : काश्मीरच्या पुलवामामध्ये मोठी चकमक, CRPF च्या जवानांकडून एका दहशतवाद्याला कंठस्नान

यानंतर आता एनआयएकडून कोलकाता येथून शुक्रवारी दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या दोघांपैकी एकजण या घटनेचा सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. अब्दुल मतीन ताहा असे त्याचे नाव असून तो रामेश्वर कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाचा मुख्य सूत्रधार आहे. तर त्याच्याबरोबर आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुसावीर हुसैन शाहजीब असे त्याचे नाव असून त्याने रामेश्वर कॅफेमध्ये स्फोटक ठेवली होती, अशी माहिती समोर येत आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

रामेश्वर कॅफेमध्ये काय घडले होते?

बंगळुरूमधील व्हाइटफिल्ड परिसरात असलेल्या रामेश्वर कॅफेमध्ये एका संशयित आरोपीने एक बॅग सोडली होती. संशयित आरोपीने कॅफेमध्ये नाश्ता केल्यानंतर बॅग तिथेच सोडून निघून गेला होता. त्यानंतर काही वेळाने कॅफेमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यामध्ये १० लोक जखमी झाले होते. या घटनेतील संशयित आरोपीने आपला चेहरा झाकलेला होता, असे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले होते. १ मार्च रोजी दुपारी १२.५० ते १ वाजण्याच्या सुमारास हा बॉम्बस्फोट घडला होता.