कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिबला जोडणाऱ्या थेट मार्गिकेच्या पायाभरणी समारंभात खलिस्तानी नेता गोपाल चावला हा देखील उपस्थित असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत चावलाने छायाचित्रही काढले असून हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर सिद्धूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अकाली दल व अन्य विरोधी पक्षांनी केली आहे.

कर्तारपूर मार्गिकेमुळे पाकिस्तानातील कर्तारपूर येथील गुरुद्वारा दरबार साहिब हे नानकदेवांचे समाधीस्थळ आणि भारतातील गुरुदासपूर येथील डेरा बाबा नानक हे ऐतिहासिक मोलाचे स्थान थेट जोडले जाणार आहे. या मार्गिकेचे काम सहा महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता असून या मार्गिकेचा पायाभरणीचा कार्यक्रम बुधवारी पार पडला. या कार्यक्रमात भारतातर्फे नवज्योसिंग सिद्धू, केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि हरदीप सिंग पुरी हे सहभागी झाले होते. या कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी नवज्योतसिंग सिद्धूंचे भरभरुन कौतुक केले होते. मात्र, सिद्धूंचा हा दौराही वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या कार्यक्रमात पाकिस्तानातील दहशतवादी हाफिज सईदशी संबंधित आणि खलिस्तानी नेता गोपाल चावला हा देखील उपस्थित होता. सिद्धूंसोबतचे चावलाचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले असून यावरुन विरोधी पक्षांनी सिद्धूंवीर टीका केली आहे.

चावला पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांची भेट घेतानाचे छायाचित्रही प्रसिद्ध झाले आहे. यावर पाकिस्तानी लष्कराने ट्विटरवरुन स्पष्टीकरण दिले आहे. लष्कर प्रमुखांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांचीच भेट घेतली होती. यावरुन भारतातील प्रसारमाध्यमांनी गैरअर्थ काढू नये, असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले आहे.