माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम आणखी अडचणीत आले आहेत. भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली सीबीआयने एफआयआर दाखल केल्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयही (ईडी) मनी लाँडरिंगप्रकरणी कार्ती यांच्यासह आयएनएक्स मीडियावर एफआयआर दाखल करणार आहे, असे समजते. या दोघांवर विदेशी गुंतवणूक संवर्धन मंडळाकडून (एफआयपीबी) मंजुरी मिळवून विदेशी गुंतवणूक मिळवण्यासाठी कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सीबीआयनेही सोमवारी कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर दाखल केला होता.
आम्हाला सीबीआयच्या एफआयआरची प्रत मिळाली असून लवकरच काळा पैसा पांढरा केल्याप्रकरणी कार्ती चिदंबरम आणि आयएनएक्स मीडियाविरोधात एफआयआर दाखल करणार आहोत, अशी माहिती ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला दिली. ईडीने केलेल्या छापेमारीत सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे सीबीआयने या दोघांविरोधात एफआयआर दाखल केला होता. याआधीच एअरसेल-एक्सिस प्रकरणात कार्ती यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. वासन हेल्थकेअरमध्ये विदेशी गुंतवणूक केल्याच्या प्रकरणातही त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, ईडीने एफआयआर दाखल केल्यास याप्रकरणात कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त होण्याची शक्यता वाढली आहे, असेही बोलले जाते.
दरम्यान, सीबीआयने मंगळवारी या प्रकरणात कार्ती चिदंबरम आणि पीटर मुखर्जी यांच्या निवासस्थानांसह त्यांच्याशी संबंधित मुंबई, चेन्नई, दिल्ली एनसीआरसह १४ ठिकाणांवर छापे मारले होते. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला २००७मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळाल्यानंतर ते कायद्याच्या कचाट्यात सापडू नयेत, यासाठी चिदंबरम पिता-पुत्रांनी नियम वाकवल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. या प्रकरणात या दोघांशी संबंधित निवासस्थाने आणि कार्यालयांवर छापेमारी केली होती. पी. चिदंबरम हे केंद्रात अर्थमंत्री असताना नियमबाह्य विदेशी गुंतवणूक केलेल्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला कार्ती यांनी मदत केली आणि त्या मोबदल्यात स्वतःच्या बेनामी कंपन्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा लाभ घेतला, असा दावा करणारा एफआयआर सीबीआयने दाखल केला आहे.