Engineer Rashid at Lok Sabha Remark on Operation Sindoor : जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लाह मतदारसंघाचे खासदार (अपक्ष) इंजीनियर राशिद (शेख अब्दुल राशिद) यांनी लोकसभेत भाषण करताना प्रसिद्ध उर्दू शायर हबीब जालिबची दस्तूर ही नज्म (शायरी) वाचून दाखवली. त्यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली. मात्र, त्यांच्या भाषणातील एका वक्तव्याने सर्वच खासदार व नागरिकांचे कान टवकारले. त्यांना संसदेत पोहोचण्यासाठी किती अडचणींवर मात करावी लागते याची माहिती दिली. आपली व्यथा मांडत ते म्हणाले, “कदाचित यापुढे मी संसदेत येऊ शकणार नाही. मी रोज दीड लाख (१.५ लाख) रुपये कुठून आणू? त्यामुळे मला आज बोलू द्या.”
इंजीनियर राशिद म्हणाले, “माझ्या पैगंबरांचं फरमान आहे की ज्याने एका निष्पाप व्यक्तीचा खून केला त्याने सगळी माणुसकीच नष्ट केली, अशा व्यक्तीला माफी नसते. पहलगाममध्ये जे झालं त्या घटनेने मानवताच नष्ट केली आहे. पहलगाममध्ये ज्यांचा जीव गेला त्यांचं दुःख काश्मिरी जनतेलाच अधिक जाणवतंय. आम्ही १९८९ पासून आतापर्यंत हजारो लोकांना गमावलं आहे. आम्ही विध्वंस पाहिला आहे, आम्ही स्मशानं पाहतोय, आम्ही मृतदेह उचलून उचलून आता थकलोय.”
इंजीनियर राशिद यांचा सरकारला सल्ला
बारामुल्लाहचे खासदार म्हणाले, “मी जिथून आलोय तिथून आपली सीमा खूप जवळ आहे. तिथली स्थिती पाहून मी इतकंच सांगेन की तुम्हाला (सरकारला) काश्मिरी जनतेची मनं जिंकावी लागतील. मी कालपासून पाहतोय, तुमच्यापैकी एकानेही काश्मिरी जनतेबद्दल अवाक्षर काढलेलं नाही. सत्ताधारी व विरोधकांनीही काश्मिरी जनतेचा विचार करावा.”
संसदेत जाण्यासाठी खासदार राशिद यांना दीड लाख रुपये का खर्च करावे लागतायत?
खासदार इंजीनियर राशिद हे टेरर फंडिंगच्या (दहशतवाद्यांना अर्थसहाय्य) प्रकरणात तुरुंगात आहेत. त्यांना २०१९ मध्ये बेकायदेशीर कारवाया (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) अटक करण्यात आली होती. अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांना संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी कस्टडी परोल मंजूर केला होता. परंतु, न्यायालयाने त्यांना लोकसभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी तुरुंगापासून संसदेपर्यंत पोहोचण्यासाठी परिवहन व सुरक्षा व्यवस्थेसाठी लागणारा संपूर्ण खर्च (दररोज १.४५ लाख रुपये) स्वतःच्या खिशातून करण्यास सांगितलं आहे. संसदेत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या या खर्चापासून मुक्ती मिळावी, म्हणजे हा खर्च सरकारने उचलावा यासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. परंतु, त्यांच्या या प्रयत्नांना अद्याप यश मिळालेलं नाही.