काश्मीरमध्ये शुक्रवारच्या सामूहिक प्रार्थनांनंतर लोकांच्या हालचालींवर कडक निर्बंध लागू करण्यात आल्यानंतर दुसऱ्या दिवशी, शनिवारी सकाळी काश्मीरच्या बहुतांश भागांतील निर्बंध उठवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लोकांना हालचालीसाठी मुभा देण्याकरिता श्रीनगरच्या बहुतांश भागांतील, तसेच खोऱ्यातील इतर ठिकाणच्या रस्त्यांवरील अडथळे हटवण्यात आले आहेत. तथापि, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा दलांची तैनाती कायम असल्याचेही हे अधिकारी म्हणाले.

शुक्रवारच्या प्रार्थनानंतर कायदा व सुव्यवस्था बिघडण्याच्या भीतीमुळे शुक्रवारी खोऱ्यात लोकांच्या हालचालींवर कडक निर्बंध लावण्यात आले होते. केवळ रुग्णवाहिका आणि आणीबाणीच्या परिस्थितीतील लोकांना इतरत्र जाण्यास परवानगी होती.

काश्मीरमधील परिस्थिती शुक्रवारी शांततापूर्ण होती आणि खोऱ्याच्या कुठल्याही भागातून काही अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नव्हते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. असे असले तरी काश्मीर खोऱ्यातील सामान्य जनजीवन सलग २७व्या दिवशीही प्रभावित होते. बाजारपेठा अद्यापही बंद असून सार्वजनिक वाहतूक सुरू नाही. शाळाही अद्याप सुरू झालेल्या नाहीत. परिस्थिती सुधारत असल्यामुळे खोऱ्याच्या बहुतांश भागातील दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, तथापि लाल चौक हा व्यापारी भाग आणि प्रेस एन्क्लेव्ह येथील या सेवा बंद आहेत. मोबाइल आणि इंटरनेट सेवाही बंद  आहे.

युद्ध हा पर्याय नाही- कुरेशी

इस्लामाबाद : जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याच्या मुद्दय़ावरून भारत व पाकिस्तान यांच्यात नव्याने तणाव निर्माण झालेला असतानाच, काश्मीरच्या मुद्दय़ाचा निकाल लावण्यासाठी युद्ध हा काही पर्याय नाही, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटले आहे.

काश्मीरच्या मुद्दय़ाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे या मुद्दय़ावर भारतासोबत अणुयुद्ध होण्याची वारंवार धमकी देत असल्याच्या पाश्र्वभूमीवर कुरेशी यांनी हे वक्तव्य केले आहे.

पाकिस्तानने कधीही आक्रमक धोरण अमलात आणले नाही आणि नेहमीच शांततेला प्राधान्य दिल्याचे बीबीसी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत कुरेशी म्हणाले. पाकिस्तानच्या सध्याच्या सरकारने वारंवार भारतापुढे बोलणी सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, कारण हे दोन्ही अण्वस्त्रसज्ज शेजारी देश युद्धाचा धोका पत्करू शकत नाहीत, असे त्यांनी सांगितले. काश्मीर हा केवळ पाकिस्तान व भारत यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा नसून आंतरराष्ट्रीय मुद्दा असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.