विस्थापित काश्मिरी पंडितांचे जम्मू-काश्मीरमध्ये पुनर्वसन करण्यासाठी या समाजातील नेत्यांसमवेत गांभीर्याने चर्चा सुरू करावी, अशी विनंती पंडितांनी केंद्र सरकारला केली आहे. काश्मिरी पंडितांच्या नेत्यांसमवेत चर्चेला सुरुवात करावी आणि चर्चा करताना त्यांच्या इच्छा-आकांक्षांची जाणीव ठेवावी, असे आवाहन पनून काश्मीरचे अध्यक्ष अश्विनीकुमार यांनी केंद्र सरकारला केले आहे. गेल्या २५ वर्षांपासून काश्मिरी पंडित विस्थापित झालेले आहेत.
काश्मीर खोऱ्यातून विस्थापित होऊन २५ वर्षे झाली त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात अश्विनीकुमार यांनी, काश्मिरी पंडितांचा काश्मीरच्या भूमीवर पहिला आणि नैसर्गिक हक्क असल्याचे स्पष्ट केले.
काश्मिरी पंडितांची निदर्शने
नवी दिल्ली : विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांनी सोमवारी येथे जोरदार निदर्शने केली आणि पुनर्वसनासाठी त्वरेने पावले उचलण्याची आग्रही मागणी केली. काश्मिरी पंडितांचे खोऱ्यात पुनर्वसन व्हावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकार कोणतीही पावले उचलत नसल्याचा आरोप या पंडितांनी केला.
काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी आतापर्यंत राज्य आणि केंद्र सरकारने काय केले त्याबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी जंतरमंतर येथे काळे बिल्ले लावून पंडितांनी केली.