विस्थापित काश्मिरी पंडितांसाठी ‘स्वतंत्र मायभूमी’च्या मागणीचा पुनरुच्चार करतानाच, या समुदायाच्या संघर्षांला देशभरातील उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी पाठिंबा जाहीर केला.
आपल्यासाठी काश्मीर खोऱ्यात ‘स्वतंत्र मायभूमी’ निर्माण केली जावी अशी मागणी काश्मिरी हिंदूंनी १९९१ साली याच दिवशी केली होती व या चळवळीला ‘पनून काश्मीर’ (आमचे काश्मीर) असे नाव दिले होते. भारतीय घटनेच्या अखत्यारीत असलेल्या केंद्र-प्रशासित संघराज्यानुसार आपला कारभार चालावा, असेही त्यांनी म्हटले होते.
या संदर्भातील ‘मार्गदर्शन ठराव’ ज्या दिवशी संमत करण्यात आलेला तो २८ डिसेंबर हा दिवस काश्मिरी पंडित ‘मायभूमी दिवस’ म्हणून साजरा करतात. झेलम नदीच्या उत्तर व पूर्वेकडील भागातून विस्थापित झालेल्या ७ लाख काश्मिरी पंडितांसाठी वेगळी मायभूमी दिली जावी, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे. या दिवसाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘पनून काश्मीर’ चळवळीने रविवारी राष्ट्रीय राजधानीत त्यांची दुसरी ‘आंतरराष्ट्रीय काश्मिरी हिंदू युवक परिषद’ आयोजित केली होती. पश्चिम बंगालमधील हिंदू संहाती, कर्नाटकमधील श्रीराम सेना, महाराष्ट्रातील सनातन संस्था, तामिळनाडूतील हिंदू मक्कल काछी, शिवसेना आणि हिंदू गौवंश रक्षण समिती या उजव्या संघटनांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले होते.