काझीरंगा अभयारण्याची प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनवर (बीबीसी) भारताकडून पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारने घातलेल्या या बंदीमुळे आता बीबीसीला पुढील पाच वर्षे भारतामधील राष्ट्रीय उद्यानं आणि अभयारण्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे चित्रीकरण करता येणार नाही. काही दिवसांपूर्वी बीबीसीकडून प्रदर्शित करण्यात आलेल्या एका माहितीपटामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिष्ठेची न भरुन येणारी हानी झाल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे १० एप्रिल २०१७ पासून बीबीसीला भारतात माहितीपट किंवा वार्तांकनासाठी चित्रीकरण करू न देण्याचा निर्णय सरकारने घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ( एनटीसीए) काझीरंगा अभयारण्यातील परिस्थितीचे चुकीचे पद्धतीने वार्तांकन केल्याप्रकरणी बीबीसीचे दक्षिण आशियातील प्रतिनिधी जस्टीन रॉवलाट यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. तसेच बीबीसीवर बंदी टाकण्याची शिफारसही केली होती. बीबीसीकडून तयार करण्यात आलेल्या या माहितीपटात काझीरंगा अभयारण्यातील शिकार रोखण्यासासंदर्भातील धोरणाविषयी भाष्य करण्यात आले होते. २७ फेब्रुवारीला एनटीसीएने आसाममधील सर्व व्याघ्र प्रकल्पांच्या प्रमुखांना बीबीसीला कोणत्याही प्रकारच्या चित्रीकरणासाठी परवानगी न देण्याचे आदेशही दिले होते. केंद्रीय वनमंत्रालयाने एनटीसीएचा हा निर्णय उचलून धरला असून त्यानुसार १० एप्रिलपासून बीबीसीला देशभरातील कोणत्याही राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यांमध्ये चित्रीकरण करता येणार नाही.एनटीसीएने केंद्रीय वनमंत्रालयाला दिलेल्या माहितीनुसार, बीबीसीने माहितीपटाचे चित्रीकरण करताना अनेक नियम व अटींचे उल्लंघन केल्याचे म्हटले होते. बीबीसीने काझीरंगा अभयरण्यातील व्याघ्र प्रकल्पाचे नकारात्मक, द्वेषयुक्त आणि सनसनाटी चित्रण केले. हा माहितीपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झाल्यामुळे भारताच्या प्रतिष्ठेची न भरून येणारी हानी झाल्याचेही एनटीसीएने सरकारला कळवले होते.

याबद्दल बीबीसीच्या प्रवक्त्यांना विचारले असता त्यांनी म्हटले की, वन्यजीवांची शिकार रोखण्यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्याविषयी भारतीय अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया निराशाजनक होती. आमचा माहितीपट संतुलित, नि: पक्षपाती आणि परिस्थिती जशीच्या तशी मांडणारा होता. या माहितीपटात भारताच्या वन्यजीव धोरणाच्या यशाबरोबरच त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्याही मांडण्यात आल्या आल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kaziranga film bbc banned for 5 years from all national parks sanctuaries
First published on: 15-04-2017 at 08:40 IST