दिल्लीतील पोलीस दल आम आदमी पार्टीच्या (आप) नेतृत्वाखालील सरकारच्या नियंत्रणाखाली आणावे, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे. केजरीवाल यांनी तीन पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली होती त्याला दिल्ली पोलिसांनी स्पष्ट नकार दिल्यानंतर केजरीवाल यांनी गृहमंत्र्यांकडे वरील मागणी केली आहे.
आपच्या सरकारमधील सोमथान भारती आणि राखी बिर्ला यांनी केलेल्या दोन गुन्ह्य़ांच्या तक्रारींकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने केजरीवाल यांनी आपच्या शिष्टमंडळासह शुक्रवारी शिंदे यांनी भेट घेतली आणि पोलिसांना निलंबित करण्याच्या आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला.
गुरूवारी भारती आणि बिर्ला यांचे पोलिसांशी खटके उडाले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी मंत्र्यांना पाठीशी घालून पोलिसांवरच तडजोडीचा आरोप केला होता. गुन्हेगारीचा आलेख वाढतच असल्याचे केजरीवाल म्हणाले.
दिल्लीच्या दक्षिण भागातील खिरकी येथे सेक्स आणि अमली पदार्थाचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी सोमनाथ भारती यांनी पुढाकार घेतला. भारती यांनी पोलिसांना आपल्यासमवेत येण्यास सांगितले तेव्हा पोलिसांनी शोध वॉरण्ट किंवा योग्य पोलीस बंदोबस्ताचा अभाव असल्याचे कारण देऊन भारती यांच्यासमवेत छापा टाकण्यासाठी जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. अशा प्रकारचा छापा बेकायदेशीर ठरला असता, असे एका ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. सागरपूर भागातील महिलेला भाजलेल्या अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्या प्रकरणी तिच्या नातेवाईकांना अटक करावी, अशी मागणी राखी बिर्ला यांनी केली, मात्र पोलिसांनी त्यालाही नकार दिला.
दिल्लीचे विधिमंत्री सोमनाथ भारती यांचे वर्तन अनुचित असल्याने त्यांची मंत्रिपदावरून उचलबागंडी करावी, अशी मागणी भाजपचे नेते हर्षवर्धन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jan 2014 रोजी प्रकाशित
दिल्लीतील पोलिसांचे नियंत्रण ‘आप’ सरकारकडे द्यावे
दिल्लीतील पोलीस दल आम आदमी पार्टीच्या (आप) नेतृत्वाखालील सरकारच्या नियंत्रणाखाली आणावे, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे केली आहे.

First published on: 18-01-2014 at 01:44 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kejriwal aap ministers mlas to protest outside home ministry