दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मला सुरक्षा नको, असे कितीही म्हणत असले, तरी त्यांच्या नकळत त्यांना पुरेशी सुरक्षा पुरविण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शुक्रवारी दिली.
ज्यांच्या जीविताला धोका आहे, अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरविणे हे केंद्र आणि राज्य सरकारचे आणि केंद्रीय गृह मंत्रालयाचे कामच असल्याचे सांगत केजरीवाल यांच्याभोवतीही त्यांच्या नकळत सुरक्षेचे कडे कार्यरत असते, असे शिंदे म्हणाले. दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून केजरीवाल यांनी सातत्याने आपल्याला कोणतीही सुरक्षा नको असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सरकारी लाल दिव्याची गाडी वापरण्यासही नकार दिला होता.
आम आदमी पक्षाच्या कौशंबी येथील कार्यालयावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांच्याकडे सुरक्षा घेण्यासाठी सातत्याने विचारणा होत होती. मात्र, त्यांनी त्यास ठाम नकार दिला होता. शिंदे म्हणाले, दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून केजरीवाल यांना पुरेशी सुरक्षा देण्यात आलेली आहे. मात्र, त्याबाबत त्यांना काहीही माहिती नाही. केजरीवाल यांना सुरक्षा घेण्यासाठी तीन वेळा विचारण्यात आले. त्यापैकी दोन वेळा त्यांनी त्यास नकार दिला.