जाहीर सभेत जनतेकडून सूचना; प्रश्न स्वीकारणार
दिल्ली सरकारला सत्तेवर येऊन येत्या १४ फेब्रुवारी रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आप सरकारने एका जाहीर सभेचे आयोजन केले असून त्या वेळी मंत्रिमंडळातील सहकारी जनतेकडून प्रश्न आणि सूचना मागविणार आहेत, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले.
केजरीवाल आणि त्यांचे सहकारी या वेळी दूरध्वनीवरूनही प्रश्न स्वीकारणार असून जनतेसमोर सरकारने केलेल्या कामांचे प्रगतिपुस्तकही सादर करणार आहेत. मात्र जाहीर सभेचे ठिकाण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.
येत्या १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत मंत्रिमंडळ जनतेकडून दूरध्वनीवरून प्रश्न आणि सूचना स्वीकारणार आहेत, असे केजरीवाल यांनी ट्वीट केले आहे. एका वर्षांत आपल्या सरकारने काय केले त्याचे प्रगतिपुस्तकही त्या दिवशी सादर केले जाणार आहे, असेही केजरीवाल यांनी ट्वीट केले आहे.
सर्व विभागांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना या कार्यक्रमाच्या तयारीचा एक भाग म्हणून केजरीवाल यांनी केल्या आहेत. या वेळी सरकारने केलेल्या कामांची माहिती देणारी एक पुस्तिकाही प्रसिद्ध केली जाणार आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या कार्यक्रमाला केजरीवाल यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळ हजर राहणार आहे.