मागील काही दिवसांपासून केरळ सरकार आणि राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांच्यात वाद सुरू आहे. राज्यपाल खान यांच्याविरोधात एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत केलेल्या आंदोलनावरून या वादाला तोंड फुटलं. यावरून खान यांनी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर आरोप केले. हे आंदोलन मुख्यमंत्र्यांनीच घडवून आणलं. आंदोलन करणारे विद्यार्थी हे भाड्याने आणलेले लोक आहेत, असा आरोप राज्यपालांनी केला. तसेच त्यांनी आंदोलनकर्त्यांना ‘गुन्हेगार’ संबोधलं आहे.

राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या एसएफआय सदस्यांच्या गटाला ‘गुन्हेगार’ संबोधल्याबद्दल मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी हल्लाबोल केला. भाजपाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने विचलित माणसाला मोकळं सोडलं आहे, अशी टीका विजयन यांनी केली. ते अदूर येथील एका मेळाव्याला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी राज्यपाल खान यांनी कन्नूर येथे केलेल्या वक्तव्यावरूनही टीका केली.

“अशा विचलित माणसाला असं मोकळं सोडणं योग्य नाही. त्यांना अशा स्थितीत सोडणं चांगलं नाही, हे किमान केंद्र सरकारने समजून घेतलं पाहिजे. केंद्र सरकारच्या संगनमताने सर्व काही घडत आहे, हे आम्हाला माहीत आहे. पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असते,” असं मुख्यमंत्री म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यपाल आरिफ खान हे त्यांच्या विचारसरणीला विरोध करणार्‍यांना ‘बदमाश’ (रास्कल्स) म्हणत आहेत. याआधी त्यांनी प्रसिद्ध इतिहासकार इरफान हबीब यांनाही बदमाश म्हटलं होतं. आता ते आंदोलक विद्यार्थ्यांना ‘बदमाश’ आणि ‘गुन्हेगार’ म्हणत आहेत. आमच्या सरकार विरोधातही अशी निदर्शने केली जात आहेत, परंतु आम्ही आंदोलकांना कधीही “बदमाश किंवा गुन्हेगार” म्हटलं नाही, असं विजयन म्हणाले.