पालक्काड : केरळच्या पालक्काड जिल्ह्यात झालेल्या दोन भावांच्या खून प्रकरणात सत्र न्यायालयाने इंडियन युनियन मुस्लीम लीगचे (आययूएमएल) कार्यकर्ते असलेल्या २५ जणांना सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

डाव्या आघाडीची समर्थक असलेल्या एपी सुन्नी पार्टीचे सदस्य नुरुद्दीन व हमझा या दोन भावांच्या खुनासाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश रजिता टी.एच. यांनी १२ मे रोजी २५ आरोपींना दोषी ठरवले होते. सोमवारी न्यायालयाने या सर्वाना खुनाच्या आरोपाखाली जन्मठेप सुनावली, अशी माहिती विशेष सरकारी वकील कृष्णन नारायण यांनी दिली.

मृतांच्या भावावर केलेल्या हल्ल्याबद्दल खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली या सर्वाना दोषी ठरवून प्रत्येकी ३ वर्षांची कैद सुनावण्यात आल्याचेही कृष्णन यांनी सांगितले. न्यायालयाने प्रत्येक आरोपीला १.१५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला असून ही एकूण रक्कम मृतांच्या कुटुंबीयांना दिली जाणार आहे, असे ते म्हणाले.

तीन भावांपैकी केवळ कुंजु मोहम्मद हा हल्ल्यातून बचावला आणि तो या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार होता. एका मशिदीसाठी देणग्या गोळा करण्याच्या मुद्दय़ावर दोन बाजूंमध्ये झालेल्या वादावादीचे पर्यवसान हल्ल्यात झाले होते.