Kerala High Court Hearing: न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान वकिलांचा युक्तिवाद, वादी-प्रतिवादींची गैरहजेरी, साक्षीदारांनी फिरवलेले जबाब अशा अनेक कारणांमुळे आजपर्यंत न्यायालयाचं कामकाज बऱ्याचदा थांबवून सुनावणीसाठी पुढील तारीख दिली गेल्याचं दिसून आलं आहे. पण आता चक्क एका प्राण्यामुळे सुनावणीचं कामकाज थांबवण्याची वेळ न्यायालयावर आली. वकिलांसह खुद्द मुख्य न्यायमूर्तीही या प्रकाराला वैतागले. शेवटी न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आलं आणि उपस्थित झालेल्या समस्येवर काम करण्याचे निर्देश देण्यात आले! बार अँड बेंचनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.

नेमकं झालं काय?

हा सगळा प्रकार घडलाय तो थेट केरळच्या उच्च न्यायालयात! मंगळवारी सकाळी एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयाचं कामकाज सुरू झालं. वादी-प्रतिवादी, दोन्ही बाजूंचे वकील, त्यांचे सहाय्यक, न्यायालयातील इतर कर्मचारी आणि खुद्द मुख्य न्यायमूर्ती नितीन मधुकर जामदार व न्यायमूर्ती वसंत बालाजी हे न्यायालयात दाखल झाले. ठरल्याप्रमाणे प्रकरणाची सुनावणीदेखील सुरू झाली. पण काही वेळातच न्यायालयात उपस्थित लोकांमध्ये चुळबूळ सुरू झाली. वकिलांना युक्तिवाद करणं कठीण जाऊ लागलं. स्वत: न्यायमूर्तीदेखील अस्वस्थ झाले आणि त्यांनी सुनावणी काही काळासाठी थांबवत असल्याचं जाहीर केलं.

सुनावणी का थांबवली?

त्याचं झालं असं, की सुनावणी सुरू होताच काही वेळातच एक विचित्र अशी दुर्गंधी न्यायालयात पसरली. हा वास इतका उग्र होता की न्यायालयाचं कामकाज व्यवस्थितपणे करणंदेखील कठीण होऊन बसलं. शेवटी न्यायमूर्तींनी काम थांबवून प्रशासकीय पदाधिकाऱ्यांना पाचारण केलं. तिथून तातडीने काही सफाई कर्मचाऱ्यांना पाचारण करून न्यायालयाची खोली आणि वातानुकूलित व्यवस्थेच्या मोठ्या व्हेंटची सफाई करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार सफाईचं आणि न्यायालयाच्या खोलीत निर्जंतुकीकरण करण्यात आले.

कशाची दुर्गंधी पसरली होती?

दरम्यान, ही दुर्गंधी नेमकी कशाची होती, याचा अंदाज न्यायालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे. खारीच्या प्रजातीमधील एशियन पाल्म सिवेट (Asian Palm Civet) या प्राण्याच्या मलमूत्रामुळे ती दुर्गंधी पसरली असावी असं या अधिकाऱ्यांकडून नमूद करण्यात आलं आहे. प्रामुख्याने दक्षिण व पश्चिम आशियामध्ये हा प्राणी आढळून येतो. न्यायालयाच्या खोलीत लावण्यात आलेल्या मोठ्या वातानुकूलित यंत्रणेसाठी मोठे व्हेंट बसवण्यात आले आहेत. बाहेरच्या बाजूला उघडणाऱ्या या व्हेंटमध्ये हा प्राणी शिरला असावा व त्यामुळे खोलीत ही दुर्गंधी पसरली असावी, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.