Wedding Gold: केरळ उच्च न्यायालयाने एका प्रकरणात नुकताच असा निर्णय दिला आहे की, लग्नाच्या वेळी वधूला भेट म्हणून दिलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम ही तिची विशेष मालमत्ता किंवा ‘स्त्रीधन’ मानले जाते. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे स्त्रीधनावरील महिलांचा कायदेशीर अधिकार पुन्हा सिद्ध झाला आहे.

एर्नाकुलममधील कलामसेरी येथील एका महिलेने दाखल केलेल्या याचिकेला मंजुरी देताना न्यायमूर्ती देवन रामचंद्रन आणि एमबी स्नेहलता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. घटस्फोटाच्या कारवाईनंतर भेटवस्तू आणि दागिने परत करण्याचा तिचा दावा नाकारणाऱ्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाला या महिलेने आव्हान दिले होते.

यावेळी न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की, “दुर्दैवाने अशी अनेक प्रकरणे आहेत जिथे अशा मौल्यवान मालमत्तेचा पती किंवा सासरच्या लोकांनी गैरवापर केला आहे.”

“अशा हस्तांतरणाच्या खाजगी आणि अनेकदा अनौपचारिक स्वरूपामुळे, महिलांना मालकी किंवा गैरवापर सिद्ध करणारे कागदोपत्री पुरावे सादर करणे अशक्य होते. अशा परिस्थितीत न्यायालयांना न्याय देण्यासाठी संभाव्यतेच्या प्राधान्याच्या तत्त्वावर अवलंबून राहावे लागते.”

खंडपीठाने असेही नमूद केले की, “लग्नाच्या भेटवस्तूंचे वैयक्तिक आणि कागदपत्रे नसलेले स्वरूप पाहता, अशा प्रकरणांमध्ये कठोर कायदेशीर पुराव्याचा आग्रह धरणे अवास्तव ठरेल.”

याचिकाकर्त्या महिलेने असा युक्तिवाद केला होता की, २०१० मध्ये लग्नाच्या वेळी तिच्या कुटुंबीयांनी तिला ६३ तोळे सोने आणि सोन्याच्या दोन साखळ्या दिल्या होत्या. तसेच नातेवाईकांनी तिला सहा तोळे सोने भेट म्हणून दिले होते. पुढे, तिने असा आरोप केला, की मंगळसूत्र, बांगडी आणि नियमितपणे वापरल्या जाणाऱ्या दोन अंगठ्या वगळता सर्व दागिने सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने तिच्या सासरच्या तिच्याकडून काढून घेतले. नंतर तिच्या पतीने मागितलेले अतिरिक्त ५ लाख रुपये न दिल्याने त्यांच्यातील संबंध पुढे बिघडले होते.

या खटल्याच्या सुनावनीच्या वेळी महिलेने तिच्या पालकांनी मुदत ठेवीत जमा केलेल्या पैशातून सोने खरेदी केल्याचे कागदपत्रे सादर करून तिच्या दाव्याचे समर्थन केले. उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा आढावा घेतल्यानंतर, पतीने याचिकाकर्त्या पत्नीला ५९.५ तोळे सोने किंवा त्याचे सध्याचे बाजार मूल्य परत करावे असे निर्देश दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, न्यायालयाने असेही नमूद केले की, याचिकाकर्ती महिला तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या अतिरिक्त सहा तोळे सोन्याबाबत ती पुरावे देऊ शकली नाही आणि म्हणूनच तिच्या दाव्याचा तो भाग फेटाळून लावला. त्याचप्रमाणे, काही घरगुती वस्तू परत करण्याची तिची याचिका त्यांच्या गैरव्यवहाराबाबत पुराव्याअभावी फेटाळण्यात आली.