कोल्लम, अलाप्पुझा : कोचीजवळ अरबी समुद्रात बुडालेल्या लायबेरियाच्या मालवाहू जहाजातील कंटेनर वाहून केरळच्या किनाऱ्यांवर येत आहेत. त्याच वेळी जहाजातील तेल असलेल्या कंटेनरमधून तेलगळती सुरू झाल्यामुळे संपूर्ण केरळ राज्याच्या किनारपट्टीवर अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कोल्लम आणि अलाप्पुझा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हे कंटेनर आढळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे जहाज बुडाल्यानंतर मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यानंतर किनारपट्टीवरील रहिवासी आणि मच्छीमारांना सतर्क राहण्याची सूचना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने प्रसृत केलेल्या निवेदनानुसार, आतापर्यंत नऊ कंटेनर किनाऱ्यावर आले आहेत. तसेच किनारपट्टीवरील रहिवासी व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा नव्याने देण्यात आला आहे.
तटरक्षक दलाने दिलेल्या माहितीनुसार, बु़डालेल्या ‘एमएससी ईएलएसए ३’ या जहाजावर ८४.४४ मेट्रिक टन डिझेल आणि ३६७.१ मेट्रिक टन फर्नेस ऑइल होते. त्याशिवाय काही कंटेनरमध्ये कॅल्शियम कार्बाइड आणि अन्य धोकादायक पदार्थ होते. कॅल्शियम कार्बाइडची समुद्राच्या खारट पाण्याशी अभिक्रिया होऊन अॅसिटिलीन हा अत्यंत ज्वलनशील वायू तयार होतो. ही बाब चिंतेची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
तेलाविरोधात उपाययोजना
मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती दिली की, जहाजातील इंधनही समुद्रात पसरत आहे. त्याविरोधात उपाययोजना करण्यासाठी तटरक्षक दलाची दोन जहाजे तैनात करण्यात आली आहेत. तसेच समुद्रातील तेलाचा तवंग निकामी करण्यासाठी डॉर्नियर विमानातून त्यावर ‘डिस्पर्संट पावडर’ फवारली जात आहे. हे संकट श्रेणी-२मधील असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्याचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय दले, सुविधा आणि साधनसामग्रींचा वापर करता येतो.