वॉशिंग्टन : खलिस्तानी समर्थकांच्या एका गटाने येथील भारतीय दूतावासापुढे निदर्शने करून हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न केला, तसेच देशाच्या राजदूताला धमकीही दिली. मात्र, सुरक्षा यंत्रणांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे या लोकांना मालमत्तेचे नुकसान करता आले नाही.

निदर्शकांनी शनिवारी या कार्यक्रमाचे वार्ताकन करण्यासाठी आलेल्या पीटीआय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराला शाब्दिक धमक्या दिल्या व त्याच्यावर हल्लाही केला. फुटीरवादी शिखांनी अमेरिकेतील भारतीय राजदूत तरणजित सिंग संधू यांना शिवीगाळ केली व खुलेआम धमकी दिली. या निदर्शनांच्या वेळी संधू हे दूतावासात नव्हते.

बहुतांश निदर्शक त्यांच्या भाषणात केवळ भारतातच नव्हे, तर अमेरिकेतही हिंसाचारासाठी आणि भारतीय दूतावासाच्या मालमत्तेचा विध्वंस करण्यासाठी फूस लावण्याचा प्रयत्न करताना दिसत होते. काही वक्ते त्यांच्या सहकारी निदर्शकांना हिंसाचारात भाग घेण्यासाठी, तसेच रस्त्यापलीकडे असलेल्या इमारतीच्या खिडक्या व काचा तोडण्यासाठी भडकावत असल्याचे दिसत होते.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते हे पाहून यूएस सिक्रेट सव्‍‌र्हिस आणि स्थानिक पोलिसांनी जादा कुमक बोलावली व ती या भागात तैनात करण्यात आली. दूतावासापुढे किमान तीन पोलीस व्हॅन उभ्या करण्यात आल्या.

पाच निदर्शकांनी घाईत रस्ता पार केला आणि ते तिरंगा ध्वजाच्या स्तंभाजवळ शिरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी त्यांना तेथून निघून जाण्यास सांगितले.

कॅनडातील भारतविरोधी कारवायांबद्दल उच्चायुक्तांकडे चिंता व्यक्त

नवी दिल्ली :  भारताने कॅनडाचे उच्चायुक्त कॅमेरॉन मॅके यांना पाचारण करून, खलिस्तानवादी घटनांनी अलीकडेच कॅनडातील भारतीय राजदूतावासांमध्ये केलेल्या कारवायांबद्दल आपली तीव्र चिंता त्यांच्याकडे व्यक्त केली.  परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने शनिवारी मॅके यांना पाचारण केले. भारतीय राजदूतावासांमध्ये आणि वाणिज्य दूतावासांमध्ये पोलिसांची उपस्थिती असताना, फुटीरतावादी व अतिरेकी घटकांना तेथील सुरक्षा भंग करण्याची मुभा कशी देण्यात आली याबाबत त्यांना स्पष्टीकरण मागण्यात आले, असे मंत्रालयाने एका निवेदनात सांगितले. गेल्या रविवारी, खलिस्तानी समर्थकांच्या हिंसक निदर्शनांनंतर भारताचे कॅनडातील उच्चायुक्त संजय कुमार वर्मा यांना ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एका कार्यक्रमातून निघून जाणे भाग पडले होते. या कार्यक्रमाचे वार्ताकन करण्यासाठी तेथे आलेले भारतीय वंशाचे पत्रकार समीर कौशल यांच्यावरही निदर्शकांनी हल्ला केला होता. उच्चायुक्तांच्या माध्यमातून कॅनडाला व्हिएन्ना संमेलनाअन्वये त्याच्या बांधिलकीची आठवण करून देण्यात आली.