पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाल्याचा आरोप झाला. यानंतर यावरून राजकारणाचा पारा चांगलाच चढला. आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवृत्ती न्यायाधीशांच्या नेतृत्वात स्वतंत्र चौकशी समिती नेमली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या काही वकिलांनी त्यांना युनायटेड किंग्डममधून (UK) धमकीचे कॉल आल्याचा आरोप केला आहे. हे रेकॉर्डेड कॉल असल्याचंही या वकिलांनी सांगितलं. या कॉलमध्ये पंजाबमधील मोदींच्या वाहतूक कोंडीची जबाबदारी आमची असल्याचा दावा शिख फॉर जस्टीस (Sikh For Justice) या खलिस्तान समर्थक संघटनेने केला आहे.

हिंदूस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सर्वोच्च न्यायालयातील वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितलं, “मला युनायटेड किंग्डममधून २ रेकॉर्डेड कॉल आले. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी मोदींच्या सुरक्षेच्या याचिकेपासून दूर रहावं असं सांगण्यात येत होतं. तसेच पंजाबमध्ये पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला ब्लॉक करण्याची जबाबदारी देखील घेण्यात आली.”

ऑडिओ क्लिपमध्ये नेमका काय दावा?

ऑडिओ क्लिपमध्ये म्हटलं आहे, “सर्वोच्च न्यायालय मोदींच्या सुरक्षेवर सुनावणी घेत आहे. पंजाबच्या शिख शेतकऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करू नका आणि मोदी सरकारला मदत करू नका. शिख फॉर जस्टीस (SFJ) मोदींचा ताफा फिरोझपूरमध्ये अडवण्यास जबाबदार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी १९८४ चं हत्याकांड आठवावं. तुम्ही एकाही हत्याऱ्याला पकडू शकत नाही. जर सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला मदत केली तर ते त्यांचं सर्वात वाईट काम असेन.”

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये जाऊन बिर्याणी खाल्ली तेव्हा भीती वाटली नाही, आपल्याच देशात फिरायला यांना भीती वाटते : कन्हैया कुमार

नेमकं काय झालं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब दौऱ्यावर होते. ते सकाळी विमानाने भटिंडा विमानतळावर पोहोचले. तिथून ते हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. पण खराब हवामानामुळे काही काळ वाट पाहूनही हेलिकॉप्टरने जाणं अशक्य झाल्यामुळे त्यांनी अखेर गाडीनेच हुसैनीवालाला जायचा निर्णय घेतला. या दोन तासाच्या प्रवासात हुसैनीवालापासून ३० किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका फ्लायओव्हरवर पंतप्रधानांचा ताफा अडकला कारण पुढे काही आंदोलक आंदोलन करत होते. २० मिनिटे थांबल्यानंतर अखेर पंतप्रधानांनी आपला दौरा रद्द करून दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला.

यावरून भाजपाकडून पंजाबमधील काँग्रेसशासित सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. खुद्द पंतप्रधानांच्याच सुरक्षेत कसूर ठेवल्याचा आरोप केंद्र सरकारने पंजाब सरकारवर केला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या प्रकारावर पंजाब सरकारकडे खुलासा देखील मागितला आहे. यासंदर्भात पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, मी किमान जिवंत तरी…”, पंजाबमधील सुरक्षेतील त्रुटीनंतर मोदींची पहिली प्रतिक्रिया

“पंतप्रधानांच्या सुरक्षेत कोणतीही कसूर राहिलेली नाही. पंतप्रधानांनी शेवटच्या क्षणी गाडीने जाण्याचा निर्णय घेतला. ते हेलिकॉप्टरने जाणार असल्याचं नियोजन होतं”, असं चन्नी म्हणाले आहेत. “फिरोजपूर जिल्ह्यातून पंतप्रधानांना त्यांचा दौरा अर्धवट सोडून परत जावं लागलं याविषयी मी खेद व्यक्त करतो. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी मी भटिंडाला जाणं अपेक्षित होतं. पण माझ्यासोबत असलेल्यांपैकी काहीजण करोना पॉझिटिव्ह आल्यामुळे मी पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी जाऊ शकलो नाही. आम्ही पंतप्रधान कार्यालयाला कळवलं होतं की तुम्ही हा दौरा रद्द करावा. कारण वातावरण आणि आंदोलकांचा मुद्दा होता. त्यांनी अचाकन त्यांच्या मार्गामध्ये बदल केल्याची माहिती आमच्याकडे नव्हती”, असं चरणजीतसिंग चन्नी म्हणाले.

हेही वाचा : … अन् त्यावेळी पंतप्रधान मोदींनी आणली होती स्वत:चीच सुरक्षा धोक्यात!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रचारसभेत लोकं न आल्यानंच दौरा केला रद्द?

दरम्यान, पंजाब कॅबिनेटमधले मंत्री राजकुमार विर्का यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेमध्ये कोणतीही कसूर झालेली नाही. यासंदर्भात करण्यात येणारे आरोप निराधार आहेत. यातलं सत्य हे आहे की भाजपाची प्रचारसभा फ्लॉप झाली होती. जेव्हा पंतप्रधानांना हे समजलं, तेव्हा त्यांनी दिल्लीला परतण्याचा निर्णय घेतला”, असं विर्का म्हणाले. पंतप्रधानांच्या नियोजित रॅलीमध्ये ७० हजार लोक येण्याचा अंदाज असताना अत्यल्प प्रतिसाद मिळाल्यानेच असे आरोप केले जात असल्याचं पंजाब काँग्रेसकडून सांगितलं जात आहे.