scorecardresearch

किम जोंग-उन अण्वस्त्रयुद्धाची तयारी करतोय? उत्तर कोरियाच्या याँगब्योनमध्ये हालचाली वाढल्या!

किम जोंग-उननं क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या सामग्रीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

kim jong un north korea
किम जोंग-उनच्या डोक्यात नेमकं चाललंय काय? (फोटो – रॉयटर्स)

एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातलं युद्ध अद्याप संपलेलं नसून अजूनही दोन्ही बाजूंनी एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी सोडली जात नाहीये. रशियाकडून तर अण्वस्त्र वापर होण्याची शक्यताही अप्रत्यक्षपणे बोलून दाखवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आधीच जगावर एका युद्धाचं सावट कायम असताना तिकडे उत्तर कोरियामध्ये अण्वस्त्रांसाठी लागणाऱ्या यंत्रसामग्री आणि इतर गोष्टींचं उत्पादन वाढवलं जात आहे. त्यामुळे उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग-उन अण्वस्त्रयुद्धाची तयारी करतोय की काय? भीती सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यक्त करण्यात येत आहे. आणि याला कारणीभूत ठरत आहेत उत्तर कोरियातील ताज्या घडामोडी!

…आणि अवघ्या जगाच्या भुवया उंचावल्या!

उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया यांच्यातलं विळ्या-भोपळ्याचं नातं अवघ्या जगाला माहिती आहे. त्यातच आपल्या आक्रमक आणि लहरी वृत्तीमुळे किम जोंग-उन कायमच चर्चेत आणि संशयाच्या केंद्रस्थानीही राहिला आहे. त्यातच किम जोंगनं नुकतंच वेगवेगळ्या क्षेपणास्त्रांसाठी लागणाऱ्या इंधनाचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिल्यामुळे अवघ्या जगाच्या भुवया उंचावल्या आहेत.

रॉयटर्सनं अमेरिकी थिंक टँकच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तामध्ये यासंदर्भातली माहिती देण्यात आली आहे. उपग्रहांद्वारे उत्तर कोरियातील याँगब्यॉन भागाची काही छायाचित्रे काढण्यात आली आहेत. हा भाग म्हणजे उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रनिर्मितीचं केंद्र आहे. त्यामुळे छायाचित्रांच्या मदतीने या भागातील हालचाली वेगाने वाढल्या असल्याचा दावा अमेरिकेच्या थिंक टँक कडून करण्यात आला आहे. ३ मार्च ते १७ मार्च या कालावधीमध्ये घेण्यात आलेल्या या छायाचित्रांवरून याँगब्यॉनमध्ये एक्स्परिमेंटल लाईट वॉटर रिॅक्टर अर्थात ELWR चं बांधकाम पूर्णत्वास आल्याचं दिसत आहे. या रिअॅक्टर्समधून पाण्याचं निर्गमनही केलं जात असल्याचं छायाचित्रांवरून स्पष्ट होत असल्याचं रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलं आहे.

दोषारोपानंतरही ट्रम्प अध्यक्षपदाच्या शर्यतीत ; एका दिवसात ४० लाख डॉलर निधीची उभारणी 

“किम जोंग-उननं नुकतेच त्याच्या प्रशासनाला अण्वस्त्रांसाठी लागणाऱ्या सामग्रीचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच या भागातील हालचाली वाढल्याचं दिसून येत आहे”, असं या वृत्तात म्हटलं आहे. आठवड्याभरापूर्वीच उत्तर कोरियानं नव्या आणि छोट्या आकाराचं अण्वस्त्र जगासमोर आणलं. त्याचवेळी अण्वस्त्रांसाठी लागणाऱ्या सामग्रीचं उत्पादनही मोठ्या प्रमाणावर वाढवण्याचं किम जोंग-उन सरकारनं जाहीर केलं. दक्षिण कोरिया आणि अमेरिकेकडून सीमाभागात लष्करी कवायती वाढवण्यात आल्याचा यावेळी किम जोंगनं निषेध केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 12:55 IST

संबंधित बातम्या