लंडन : आपण घटनात्मक सरकारच्या अनमोल सिद्धांतांचे अनुसरण करणार असून, आपल्या दिवंगत मातु:श्री महाराणी एलिझाबेथ यांनी घालून दिलेल्या नि:स्वार्थी कर्तव्याच्या वस्तुपाठाचे पालन करू, असा संकल्प ब्रिटनचे महाराज चार्ल्स तृतीय यांनी सोमवारी केला. राज्यारोहणानंतर ‘ब्रिटनचे महाराजा’ या नात्याने ब्रिटिश पार्लमेंटला संबोधित करताना ते बोलत होते.

लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर सभागृहात ‘हाऊस ऑफ कॉमन्स’ आणि ‘हाऊस ऑफ लॉर्डस’द्वारे व्यक्त केलेल्या भावनांना उत्तर देताना महाराज चार्ल्स तृतीय यांनी इतिहासाचा आढावा घेतला व आपल्या मातु:श्रींच्या कारकीर्दीतील अनेक प्रतीकांचा उल्लेख केला. ते म्हणाले, की कमी वयातच त्यांच्याकडे महाराणीपद आले. त्यानंतर त्यांनी आपला देश आणि देशवासीयांच्या सेवेसाठी, तसेच संवैधानिक सरकारच्या अनमोल सिद्धांत पालनासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला. त्यांनी मोठय़ा निष्ठेने या कटिबद्धतेचे पालन केले व नि:स्वार्थी कर्तव्याचा वस्तुपाठ घालून दिला. त्याचे ईश्वर आणि आपल्या सर्वाच्या साक्षीने अनुपालन करण्याचा संकल्प मी करतो. यावेळी त्यांनी पार्लमेंट सदस्यांशी आपल्या संबंधांबाबत भाष्य करत ‘ब्रिटिश पार्लमेंट’ ही देशाच्या ‘लोकशाहीची जीवनव्यवस्था’ असल्याचे सांगून दिवंगत महाराणी व ‘पार्लमेंट’च्या संबंधांचा आढावा घेतला.

या राष्ट्रीय शोक समारंभात सुमारे ९०० पार्लमेंट सदस्य उपस्थित होते. त्यांनी नव्या महाराजांबाबत आपली निष्ठा व्यक्त केली. ‘हाऊस ऑफ कॉमन्स’चे अध्यक्ष सर लिंडसे हॉयल यांनी शोकसंदेश वाचून दाखवला. तो नंतर महाराजा चार्ल्स यांना सुपूर्द करण्यात आला. हॉयल म्हणाले, की आपले दु:ख आमच्यापेक्षा मोठे आहे. आपल्या मातु:श्री व आमच्या दिवंगत राणीचा गौरव करण्यास आमच्याकडे शब्दच नाहीत. या समारंभानंतर राजे चार्ल्स तृतीय क्वीन कॉन्सॉर्ट कॅमिला सोबत एडिन्बर्गला रवाना झाले. हे दांपत्य तेथे दिवंगत राणीच्या अंत्ययात्रेत सहभागी होईल. महाराणीचे पार्थिव पॅलेस ऑफ होली रूड हाऊस येथून स्कॉटलंडमधील सेंट गिल्स कॅथ्रेडलमध्ये हलवले जाईल. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यासाठी विशेष प्रार्थनेनंतर नागरिकांसाठी त्यांचे पार्थिव २४ तास कॅथ्रेडलमध्ये अंतिम दर्शनार्थ ठेवण्यात येईल.

महाराजे चार्ल्स स्कॉटलंडचे पहिले मंत्री निकोला स्टर्जन यांची भेट घेतील व स्कॉटलंड पार्लमेंटमध्ये उपस्थित राहतील आणि शोक प्रस्तावाचा स्वीकार करतील. सोमवारी संध्याकाळी, किंग चार्ल्स राजघराण्यातील इतर सदस्यांसह सेंट गिल्स कॅथ्रेडल येथे प्रार्थनेला उपस्थित राहतील. जेथे राणीचे पार्थिव ठेवलेल्या पेटीभोवती राजध्वज लावला जाईल आणि स्कॉटलंडचा मुकुट त्यावर ठेवला जाईल. मंगळवारी महाराणीचे पार्थिव स्कॉटलंडहून इंग्लंडला विमानाने नेण्यात येईल. हे पार्थिव लंडनमधील ‘पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर’मध्ये नेण्यात येईल. १९ सप्टेंबपर्यंत म्हणजे अंत्यसंस्कार दिनापर्यंत हे पार्थिव वेस्टमिन्स्टर सभागृहात ठेवण्यात येईल.