इस्लामी परंपरा आणि चालीरितींचा प्रचंड पगडा असलेल्या सौदी अरेबियातील प्रशासकांकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सौदी अरेबियाचे प्रमुख राजे सलमान यांनी देशातील महिलांना वाहन चालवण्याची परवानगी दिली आहे. सौदीतील स्थानिक प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. राजे सलमान यांचा हा निर्णय सौदीतील महिलांच्यादृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण ठरेल.
श्रीमंत अरबांवर चित्ता, वाघ, सिंह पाळण्यात सौदी सरकारने घातली बंदी
King Salman orders driving licenses for women in the kingdom: Local media #SaudiArabia
— ANI (@ANI) September 26, 2017
सौदीमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी हिजाब किंवा आयबा परिधान करावा लागतो. याशिवाय, सामाजिक आणि शैक्षणिक जीवनातही त्यांच्यावर अनेक निर्बंध आहेत. हे नियम मोडणाऱ्या महिलांना तुरूंगवास किंवा चाबकाने मारण्याची शिक्षा दिली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ही परिस्थिती बदलण्यास सुरूवात झाली आहे. २०१५ मध्ये सौदी अरेबियातील महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. देशातील कर्मठ वातावरणामुळे याठिकाणी अजूनही महिला व पुरूष यांच्यात भेदभाव केला जातो. मात्र, रियाध शहराच्या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने सौदी अरेबियाच्या इतिहासात प्रथमच महिलांना मतदार आणि उमेदवार म्हणून अधिकार मिळाला होता. त्यानंतर आता महिलांना वाहन चालवण्याची परवानगी देण्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय. हा निर्णय देशातील स्त्रियांसाठी व्यक्तीस्वातंत्र्याच्यादृष्टीने महत्त्वाची पायरी ठरणार आहे.