हिंदू हे सक्तीने धर्मांतर करुन घेत नाही त्यामुळे त्यांची लोकसंख्या घटत असल्याचे वक्तव्य गृह राज्य मंत्री किरेन रिजीजू यांनी केले. अरुणाचल प्रदेश या राज्याचे रुपांतर हिंदू राज्यात केले जात असल्याचा आरोप काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर केला होता. त्याला उत्तर देताना रिजीजू यांनी हे वक्तव्य केले. हिंदू हे सक्तीने धर्मांतर करुन घेत नाहीत, त्यामुळे भारतामध्ये अल्पसंख्यांक समुदाय वाढत चालल्याचेही ते म्हणाले. इतर देशांच्या स्थितीकडे पाहिले तर आपल्या लक्षात येईल की तेथे अल्पसंख्यांक समुदाय घटत आहे परंतु भारत हा देश असा आहे की जेथे अल्पसंख्यांकांची वाढ होत आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे. सर्वधर्म समभाव जपणूक करणारा देश अशी भारताची प्रतिमा आहे. काँग्रेसने प्रक्षोभक आरोप करुन ती मलीन करू नये असे रिजीजू म्हणाले. अरुणाचल प्रदेशात सर्व जण शांतता आणि एकीने राहतात तेव्हा काँग्रेसने असे आरोप लावू नये असे ते म्हणाले.
किरेन रिजीजू यांच्या या वक्तव्यावर विरोधक टीका करत आहेत. एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी म्हणाले की रिजीजू यांनी हे विसरू नये ते पूर्ण देशाचे मंत्री आहेत केवळ हिंदूंचे नाहीत. तेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी करू नये असे ते म्हणाले. अरुणाचल प्रदेशमधील आदिवासी जमातींवर हिंदू संस्कृती लादून त्यांची संस्कृती आणि ओळख नष्ट करण्याचा भारतीय जनता पक्ष प्रयत्न करीत आहे असा आरोप काँग्रेसने केला होता. आदिवासी आणि येथील स्थानिक लोकांना समृद्ध परंपरा लाभली आहे. परंतु नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार ही संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे, असे अरुणाचल प्रदेश काँग्रेसने म्हटले होते. त्यांना उत्तर देताना रिजीजू म्हणाले अशी बेजाबदार विधाने काँग्रेस का करत आहे हे माहित नाही. परंतु अरुणाचल प्रदेशला एकोप्याने राहण्याची आणि सर्वधर्म समभावाची जपणूक करण्याची परंपरा लाभली आहे असे रिजीजू म्हणाले. या सर्व बाबींकडे पाहून काँग्रेसने आपली जबाबदारी ओळखावी असे ते म्हणाले.