Kiren Rijiju on Removal of Ministers : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व मंत्र्यांना पदावरून हटवू शकणाऱ्या विधेयकाबाबत केलेल्या वक्तव्याची बरीच चर्चा होत आहे. मोदी सरकारने बुधवारी (२० ऑगस्ट) लोकसभेमध्ये ‘१३० व्या घटनादुरुस्ती विधेयका’सह तीन विधेयके सादर केली आहेत. लाचखोरी व इतर गंभीर गुन्ह्यांमध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री अथवा केंद्रातील, राज्यातील एखाद्या मंत्र्याला सलग ३० दिवसांचा कारावास भोगावा लागला तर त्यांची पदावरून आपोआप हकालपट्टी करण्याची तरतूद या विधेयकांमध्ये आहे.
या विधेयकाला देशभरातील विरोधी पक्षांनी कडाडून विरोध केला आहे. या विधेयकाबाबत बोलताना संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकात स्वतःला सूट देण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.”
रिजिजू नेमकं काय म्हणाले?
किरेन रिजिजू म्हणाले, “केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत जेव्हा या विधेयकाबाबत चर्चा चालू होती तेव्हा एक अशी शिफारस करण्यात आली होती की पंतप्रधानांना या विधेयकातील तरतुदींपासून दूर ठेवायला हवं. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा सल्ला फेटाळला. मोदी मंत्रिमंडळाला म्हणाले ‘मी देखील एक नागरिक आहे, त्यामुळे मला कुठलीही विशेष सुरक्षा अथवा सूट मिळता कामा नये’. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर त्यावर सर्वांनीच सहमती दर्शवली.”
“देशभरातील अनेक राज्यांमध्ये आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. आमच्या लोकांनी चुका केल्या तर त्यांना त्यांचं पद सोडावं लागेल. नैतिकतेला आपण महत्त्व द्यायला हवं. विरोधी पक्षांनी नैतिकतेचा विचार केला असता, त्यांनी नैतिकतेला प्राधान्य दिलं असतं तर त्यांनी देखील या विधेयकाचं स्वागतच केलं असतं.”
व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी नवीन विधेयक आवश्यक : मोदी
“तृणमूल काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडी भ्रष्टाचाऱ्यांना संरक्षण देत आहे. केंद्र सरकारने सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने उचललेल्या कायदेशीर पावलांना तृणमूलसह विरोधी पक्ष सातत्याने विरोध करत आहेत”, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोलकाता येथील एका कार्यक्रमात केलेल्या भाषणादरम्यान केला. या आठवड्याच्या सुरुवातीला संसदेत सादर केलेल्या संविधान (१३० वी दुरुस्ती) विधेयक, २०२५ चा अप्रत्यक्ष उल्लेख करत, व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी नवीन विधेयक आवश्यक असल्याची बाबत मोदी यांनी यावेळी अधोरेखित केली.