न्यूझीलंड संघाचा आणि आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळणारा यष्टीरक्षक फलंदाज टिम सेफर्टला करोनाची लागण झाली आहे. या संक्रमणामुळे तो न्यूझीलंडला जाऊ शकला नाही. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याविषयी माहिती दिली.

करोनाची लागण झाल्यामुळे सेफर्ट उर्वरित सदस्यांसोबत न्यूझीलंडला जाऊ शकला नाही. तो अहमदाबादमध्ये आयसोलेशनमध्ये राहणार असून त्याला चेन्नईला पाठवले जाईल. तेथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले जातील.

 

आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळणारा टिम सेफर्ट दोन्ही वेळा आरटी पीसीआर चाचणीत अपयशी ठरला आणि या कारणास्तव त्याला अलग ठेवण्यात आले आहे. त्याच्यात करोनाची सौम्य लक्षणे आहेत. निगेटिव्ह चाचणी आल्यानंतर त्याला न्यूझीलंडला पाठवले जाईल. तिथे त्याला १४ दिवस क्वारंटाइनमध्ये राहावे लागेल, असे न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सांगितले.

न्यूझीलंड क्रिकेटचे चीफ एक्झिक्युटिव्ह डेव्हिड व्हाईट यांनी सांगितले, आम्ही सेफर्टसाठी शक्य तितके करू. अशी अपेक्षा आहे की लवकरच तो निगेटिव्ह येईल आणि त्याला डिस्चार्ज मिळेल. आम्ही त्याला मदत करण्यात गुंतलो आहोत. आम्ही त्याच्या कुटुंबासमवेत आहोत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

करोना विषाणूमुळे आयपीएलचा १४वा हंगाम पुढे ढकलण्यात आला. अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन थांबवण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक फलंदाज वृध्दिमान साहा करोना पॉझिटिव्ह आढळले आणि त्यानंतर आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.