जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शाकाहार आणि मांसाहाराच्या मुद्द्यावर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. विद्यार्थ्यांचे दोन गट रविवारी (१० एप्रिल) विद्यापीठातच भिडले. भाजपाशी संलग्न विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डाव्या विद्यार्थी संघटनांमध्ये हा वाद निर्माण झाला. सोमवारी विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ परिसरात शांतता आणि सौहार्द राखण्याचं आवाहन केलं. तसेच हिंसा खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही दिला. या पार्श्वभूमीवर जेएनयूमध्ये नेमकं काय घडलं याचा हा आढावा.

आतापर्यंत समोर आलेले तथ्य खालीलप्रमाणे,

१. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी रविवारी (१० एप्रिल) राम नवमीच्या दिवशी विद्यार्थ्यांना मांसाहार करण्यास विरोध केला. याला डाव्या विद्यार्थी संघटनांनी विरोध केला.

२. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी कावेरी वसतिगृहाच्या मेस सचिवासोबत गैरवर्तन गेल्याचा आरोप आहे. दुसरीकडे अभाविपच्या विद्यार्थ्यांनी डाव्या विद्यार्थी संघटनांवर मारहाणीचा आरोप केला.

३. अभाविपने मेस समितीला जेवणाचा मेन्यू बदलण्यासाठी दबाव आणला आणि डाव्या विद्यार्थी संघटनांशी संबंधित विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघाने (JNUSU) केलाय. दुसरीकडे अभाविपने डाव्या संघटनांवर राम नवमीच्या उत्सवात बाधा आणल्याचा आरोप केला.

४. अभाविपचा सदस्य रोहित कुमारने मांसाहाराला विरोध नसल्याचा दावा केलाय. आम्ही एकाच वसतिगृहात इफ्तार आणि पुजा सोबत करत असल्याचाही आणि डाव्या संघटनांना हिंदू सणांची अडचण असल्याचा आरोप रोहित कुमारने केलाय.

५. काही विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अभाविपच्या अज्ञात सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

६. अभाविपच्या सदस्यांनी देखील विरोधी तक्रार दाखल केली आहे.

७. कावेरी वसतिगृहाच्या सचिवांनी अभाविपचा दावा फेटाळला आहे. तसेच त्या दिवशी जेवणात मांसाहार न करण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याचं नमूद केलं आहे.

८. डाव्या विद्यार्थी संघटनांच्या सदस्यांनी या हिंसाचाराविरोधात सोमवारी (११ एप्रिल) दुपारी दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेर आंदोलन केले.

९. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेएनयू प्रशासनाने विद्यापीठ परिसरात धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यास परवानगी दिलेली नाही.

१०. जेएनयू प्रशासनाने या प्रकरणी स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणी कारवाईचा इशारा दिलाय. याशिवाय विद्यार्थ्यांनी शांतता राखावी असं आवाहनही करण्यात आलंय.