कोर्टामधील खटले कित्येक वर्षे प्रलंबित असतात. याच कारणामुळे शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये, असे म्हणतात. काही प्रकरणांत तर आरोपीचा मृत्यू होतो, मात्र तरीही ती प्रकरणं न्यायालयात प्रलंबितच असतात. सध्या असाच एक देशातील सर्वात जुना खटला चर्चेत आला आहे. १९५१ सालातील हा खटला मागील आठवड्यात निकाली निघाला आहे. तब्बल ७२ वर्षांपासून या खटल्यावर सुनावणी सुरू होती.

खटल्यावर कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी

बरहामपूर बँक लिमिटेडच्या लिक्विडेशनबाबत हा खटला होता. या खटल्यावर कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती. हा खटला एवढा जुना आहे की या न्यायालयाच्या विद्यमान मुख्य न्यायाधीशांचा जन्म खटला दाखल झाल्यानंतर साधारण एका दशकानंतर झालेला आहे. या खटल्याप्रमाणेच १९५२ साली दाखल करण्यात आलेले आणखी ५ असेच जुने खटले आहेत. यातील दोन खटले हे दिवाणी असून ते पश्चिम बंगालच्या मालदा न्यायालयात प्रलंबित आहेत.

हेही वाचा >>> Urfi Javed Dress : उर्फी जावेद वादावर शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “मी…”

१९५१ साली कोर्टासमोर आला होता खटला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बरहामपूर बँक लिमिटेडच्या लिक्विडेशनचा खटला १९५१ साली कोर्टासमोर आला होता. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी कोलकाता उच्च न्यायालायने १९ नोव्हेंबर १९४८ रोजी या बँकेला दिवाळखोर म्हणून जाहीर केले. तसेच या बँकेला बंद करण्याचा आदेश दिला. मात्र न्यायालयाच्या या आदेशाला आपले पैसे परत मिळावेत म्हणून अनेक ग्राहकांनी याचिकेच्या मार्फत आव्हान दिले होते. या याचिकांच्या माध्यमातून १ जानेवारी १९५१ रोजी पुन्हा हा खटला न्यायालयासमोर आला. त्यावेळी या खटल्याला ७१/१९५१ हा क्रमांक देण्यात आला होता. तेव्हापासूनच या खटल्यावर सुनावणी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात बँकेच्या लिक्विडेशनला आव्हान देणाऱ्या याचिकांवर दोन वेळा सुनावणी घेण्यात आली होती. मात्र त्यावेळी या तारखांना कोणीही हजर राहिले नव्हते. मात्र आता हा खटला निकाली निघाला आहे.