या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळातही हरिद्वारमधील कुंभमेळा १ एप्रिलपासून २८ दिवसांच्या कालावधीसाठी होणार असून त्यासाठी प्रमाणित संचालन पद्धतींचा अवलंब करण्यात येणार आहे. कुंभमेळ्यास येणाऱ्या प्रत्येक भक्तगणाकडे आरटीपीसीआर चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल असणे बंधनकारक आहे. ही चाचणी येण्याच्या ७२ तास आधी केलेली असणेही बंधनकारक असून जे भक्तगण नियमांचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून त्यात म्हटल्यानुसार प्रत्येक भक्तगणास वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र व इ पास, इ परमिट आवश्यक आहे. भक्तगणांना कुंभमेळा वेब पोर्टलवर नोंदणी करावी लागणार असल्याचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी म्हटले आहे. कुंभमेळा १ एप्रिलपासून २८ दिवस होणार असून कुंभमेळ्याचा कालावधी कोविडमुळे कमी करण्यात आला आहे. भक्तगणांना आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल जवळ ठेवावे लागणार आहेत. सर्व राज्यांनी कुंभमेळ्याच्या प्रमाणित संचालन प्रक्रियेला पुरेशी प्रसिद्धी द्यावी असे सांगण्यात आले. राज्य आरोग्य खात्याला आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना कुंभमेळ्याच्या ठिकाणी तैनात केले जाणार असून त्यांचे लसीकरण आधी केले जाणार आहे.

कोविड काळात भक्तगणांनी सामाजिक अंतराचा निकष पाळणे गरेजेचे असून दोन व्यक्तीत सहा फुटांचे अंतर गरजेचे आहे तसेच मुखपट्टीचा वापरही आवश्यक करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही लोक येथे येऊ शकतात त्यांनाही या नियमांचे पालन करावे लागणार आहे. अनेक देशांचे लोक कुंभमेळ्यासाठी येत असतात.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumbh mela by observing restrictions abn
First published on: 01-03-2021 at 00:34 IST