Kuwait Fire : कुवैतच्या मंगाफ शहरात बुधवारी (१२ जून) सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका इमारतील आग लागून ४९ जणांचा बळी गेला आहे. मृतांमध्ये १० भारतीय नागरिकांचा समावेश होता. स्थानिक माध्यमांनी मृतांच्या आकडेवारीची पुष्टी केली आहे. या भीषण आगीत ५० जण होरपळून निघाले असून त्यांना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की, बुधवारी सकाळी दक्षिण कुवैतमधील मंगाफ शहरातील एका इमारतीत आग लागली. या इमारतीत भारतासह आशियातून आलेल्या मजुरांचं वास्तव्य आहे. या इमरातीला आग लागून येथे राहणाऱ्या ४९ मजुरांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच ५० जण जखमी असून त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

मेजर जनरल रशीद हमद म्हणाले, स्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजता आम्हाला या आगीच्या घटनेची माहिती मिळाली. आम्ही त्वरित ही माहिती अग्निशमन दलासह संबंधित अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर बचावकार्य हाती घेण्यात आलं. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार एका घरातील स्वयंपाकघरात आग लागली आणि ती आग काही मिनिटात संपूर्ण इमारतीत पसरली.

इमारतीतल्या ज्या घरात आग लागली त्या घरात केरळमधील एक व्यक्ती वास्तव्यास होती. या इमारतीत राहणारे बहुसंख्य लोक दक्षिण भारतीय नागरिक आहेत. तसेच या आगीत मृत्यू झालेल्या १० भारतीयांपैकी पाच जण मूळचे केरळचे रहिवासी होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच कुवैतचे उपपंतप्रधान फहद युसुफ अल सबा यांनी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी पोलिसांना या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा >> Dombivli MIDC Fire : आणखी एका कारखान्याला आग, स्फोटांच्या मालिकेमुळे परिसरात घबराट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्थानिक वृत्तवाहिनी स्टेट टीव्हीने एका वरिष्ठ पोलीस कमांडरच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीत मजुरांचे क्वार्टर आहेत. आग लागली तेव्हा पहाटेची वेळ होती. त्यामुळे जवळपास सर्वच मजूर आपापल्या घरात होते. दरम्यान, इमारतीला आग लागल्यानंतर बचाव पथकांनी अनेक मजुरांना वाचवलं आहे. तसेच काहींना जखमी अवस्थेत इमारतीतून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचाव पथकांनी या मजुरांना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र दुर्दैवाने अनेक मजुरांचा धुरामुळे घुसमटून मृत्यू झाला. कुवैत आरोग्य मंत्रालयाने या घटनेची माहिती देत म्हटलं आहे की, या आगीच्या घटनेत आतापर्यंत ४१ जणांचा बळी गेला असून ४० जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार चालू आहेत.