Labubu Dall on Karl Marx’s Grave: गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असल्याचं दिसत आहे. या फोटोमध्ये कार्ल मार्क्सच्या दफनस्थळावर चक्क लबुबू बाहुली ठेवल्याचं दिसत आहे. या बाहुलीची सध्या सोशल मीडियावर मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. हीच बाहुली कार्ल मार्क्सच्या दफनस्थळावर ठेवण्यात आल्यामुळे दोन टोकाच्या विचारसरणी एकत्र एकाच फोटोमध्ये दिसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पण त्याचबरोबरीने मार्क्सच्या दफनस्थळावर भांडवलवादाचं प्रतीक असणारी लबुबू बाहुली असणं हे टोकाचं विडंबन असल्याच्याही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ वर्गांमधील संघर्षाचा सिद्धांत मांडणारा कार्ल मार्क्स हे नाव जगभरातल्या विचारवंतांच्या विश्लेषणात किमान एकदा तरी येतंच. असे अपवादात्मक विषयच असतील, ज्यात मार्क्सने काही लिहिलेलं नाही. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसिक अशा अनेक मुद्द्यांवर कार्ल्स मार्क्सनं लिखाण केलं आहे. मार्क्सच्या आर्थिक विचारांमध्ये प्रामुख्याने समाजातील भांडवलशाहीवर ताशेरे ओढण्यात आले आहेत, तर कामागार वर्गाच्या हुकुमशाहीचं समर्थन केलं आहे. पण त्याच मार्क्सच्या दफनस्थळावर चक्क लबुबू बाहुली ठेवल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर तुफान चर्चा होताना दिसत आहे.
काय आहे फोटोमध्ये?
हा फोटो जगभरातल्या विचारवंतांच्या आणि जगभरात आजतागायत अस्तित्वास असणाऱ्या विचारसरणींच्या इतिहासात अढळ स्थान मिळालेला जर्मन तत्वज्ञ कार्ल मार्क्स याच्या लंडनच्या हायगेटमधील दफनस्थळाचा आहे. या दफनस्थळावर एका चीनी विद्यार्थ्याने लिहिलेलं तीन पानी पत्र ठेवण्यात आलं आहे. सामान्यपणे अशा ठिकाणी पत्रं ठेवली जात नाहीत. पण या पत्रापेक्षाही उपस्थितांसह सोशल मीडियावर फोटो पाहणाऱ्या नेटिझन्सचंही लक्ष वेगळ्याच गोष्टीनं वेधून घेतलं. मार्क्सच्या दफनस्थळावर ठेवण्यात आलेल्या या पत्रावर चक्क लबुबू बाहुली ठेवली होती.
काय आहे लबुबू बाहुली?
‘दी मॉन्स्टर्स’ या सीरिजमधील एक पात्र म्हणजे लबुबू. २०१५ साली हाँगकाँगमधील डिझायनर गसिंग ल्युंग यांच्या पुस्तकातून या पात्राचा जन्म झाला. याच पात्राचं प्रत्यक्ष रूप म्हणजे लबुबू बाहुल्या. भलामोठा पसारा असणारी चीनची कंपनी पॉप मार्टकडून या बाहुल्यांचं उत्पादन केलं जातं. या बाहुल्यांचे मोठे डोळे, निमुळते कान आणि एक विक्षिप्त हास्य अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे ही बाहुली आकर्षक पण त्याचवेळी भीतीदायकही ठरते. कंपनीकडून बंद खोक्यामध्ये तिची विक्री केली जाते. या बाहुल्या संग्राह्य गोष्ट म्हणून मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत.
लबुबू बाहुल्यांकडे भांडवलशाहीचं एक प्रतीक म्हणून पाहिलं जात आहे. या बाहुल्यांच्या किमती, त्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी, बाजारपेठेतील स्थान अशा अनेक गोष्टींमुळे त्यांचा संदर्भ थेट भांडवलशाहीच्या बाबतीत दिला जात आहे. त्यामुळेच नेटिझन्सकडून या बाहुल्या आयुष्यभर भांडवलशाहीच्या विरोधात लढा देणाऱ्या कार्ल मार्क्सच्या दफनस्थळावर दिसणं हा प्रचंड मोठा विरोधाभास आणि टोकाचं विडंबन असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे.
कार्ल मार्क्ससंदर्भात नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
“एक भांडवलशाहीचं प्रतीक प्रत्यक्ष भांडवलशाहीलाच विरोध करणाऱ्या व्यक्तीच्या दफनस्थळावर असणं यात एक प्रकारची काव्यात्मकता जाणवते. हे टोकाचं विडंबन आहे”, अशी प्रतिक्रिया एका युजरनं दिली आहे. दुसऱ्या युजरनं “मार्क्सला अशा पहारेकऱ्याची गरज पडेल, याचा विचार कुणी केला होता?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तिसऱ्या युजरनं “कार्ल मार्क्सला चिरशांती लाभो, त्यानं या बाहुल्यांचा प्रचंड राग केला असता”, अशी कमेंट केली आहे.