‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ सारख्या अनेक चित्रपटांत लहान-मोठय़ा भूमिकांमधूनही लक्षात राहणारे ज्येष्ठ अभिनेते राजेश विवेक यांचे गुरुवारी निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. आमीर खानच्या ‘लगान’ चित्रपटातील ‘गरन’ तसेच ‘स्वदेस’मधील पोस्टमास्टरच्या भूमिकेमुळे लक्षात राहिले होते. राजेश यांच्या मित्राने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री हैदराबाद येथे त्यांचे निधन झाले. ते याठिकाणी एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आले होते. राजेशचा मृत्यू आमच्यासाठी धक्कादायक गोष्ट असल्याचेही त्यांचे मित्र विष्णू शर्मा यांनी सांगितले. त्यांचे पार्थिव आज सकाळी मुंबईच्या वर्सोवातील त्यांच्या राहत्या घरी आणण्यात येणार आहे. राजेश विवेक यांचा जन्म ३१ जानेवारी १९४९ रोजी उत्तर प्रदेशात झाला होता. त्यांनी जौनपूरमधूनच एमए पूर्ण केले. त्यानंतर दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले.
राजेश विवेक यांनी १९७८ मध्ये श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. याशिवाय, छोट्या पडद्यावरील ‘महाभारत’, ‘भारत एक खोज’, ‘अघोरी’ या लोकप्रिय मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते. सुरूवातीच्या काळात त्यांनी ‘विराना’ आणि ‘जोशीले’ यांसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकी स्वरूपाच्या भूमिका साकारल्या. मात्र, त्यानंतर त्यांनी विनोदी आणि सहकलाकराच्या भूमिका करण्यावर भर दिला. बॉलीवूडच्या ‘बंटी और बबली’, ‘भूत अंकल’, ‘व्हॉट इज युअर राशी’, ‘अग्निपथ’, ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
संग्रहित लेख, दिनांक 15th Jan 2016 रोजी प्रकाशित
अभिनेता राजेश विवेक यांचे हदयविकाराच्या धक्क्याने निधन
‘लगान’ या चित्रपटातील त्यांची गुरन बाबा ही भूमिका अतिशय गाजली होती.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 15-01-2016 at 07:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lagaan actor rajesh vivek dies of heart attack in hyderabad