गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार राहुल गांधी यांच्या निलंबनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून भाजपावर टीकास्र सोडण्यात येत आहे. राहुल गांधींप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल यांच्या निलंबनाच्या प्रकरणाचाही संदर्भ दिला जात आहे. याच फैजल यांना या प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या काही वेळ आधीच त्यांची खासदारकी पुन्हा मिळाली आहे.

राहुल गांधींची खासदारकी रद्द

मोदी आडनावाचा अपमान केल्याच्या प्रकरणात राहुल गांधींना गुजरातमधील एका न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी जाहीर केला. त्यानंतर राहुल गांधींना त्यांचं शासकीय निवासस्थान असणारा १२ तुघलक लेन बंगलाही रिकामा करण्याचे निर्देश लोकसभा हाऊस कमिटीनं दिले. त्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे.

मोहम्मद फैजल यांची शिक्षा रद्द

राहुल गांधींच्या खासदारकीबाबत टीका करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे लक्षद्वीपमधील खासदार मोहम्मद फैजल यांच्याबाबत घडलेल्या प्रकाराचाही संदर्भ दिला जात आहे. मोहम्मद फैजल यांना १३ जानेवारी २०२३ रोजी लोकसभेतून निलंबित करण्यात आलं होतं. त्यांच्यसह इतर तिघांना एका हत्या प्रकरणात केरळमधील कवरत्ती न्यायालयाने १० वर्षांचा सश्रम कारावास आणि १ लाखांच्या दंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र, त्यानंतर केरळ उच्च न्यायालयाने २५ जानेवारी रोजीच त्यांची शिक्षा रद्द केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फैजल यांचाच न्याय राहुल गांधींना लागू होईल?

शिक्षा रद्द होऊन दोन महिने उलटल्यानंतरही खासदारकी पुन्हा दिली जात नसल्याची तक्रार नोंदवत मोहम्मद फैजल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीही होणार होती. मात्र, ही सुनावणी होण्याआधीच फैजल यांची खासदारकी पुन्हा नियमित करण्याचा निर्णय लोकसभा सचिवालयाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद आता राहुल गांधींच्या खासदारकी रद्द प्रकरणावरही पडण्याची शक्यता आहे.