पुत्र व उपमुख्यमंत्री तेजस्वी यांना वाचविण्यासाठी दोन मंत्र्यांना साकडे घातल्याची माहिती उघड

आपल्याला नरेंद्र मोदी सरकार सहजासहजी सोडणार नसल्याची जाणीव कदाचित बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना यापूर्वीच झाली असावी. म्हणून तर त्यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारबरोबर समझोत्याचा अयशस्वी प्रयत्न केला असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. कारण या रदबदलीच्या प्रयत्नांनंतरही लालूंविरुद्ध पहिल्यांदा प्राप्तीकर खात्याने आणि आता सीबीआयने छापे मारले आहेत.

‘लालूप्रसादांचे अत्यंत निकटवर्तीय नेते मोदी सरकारच्या दोन वरिष्ठ मंत्र्यांना भेटले होते. लालूप्रसादांच्या कुटुंबीयांना, विशेषत: पुत्र व उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना लक्ष्य करू नये, असे कळवळून साकडे लालूंच्या वतीने त्या नेत्याने घातले होते. पण दोन्हीही मंत्र्यांनी मदत करता येणार नसल्याची अपरिहार्यता स्पष्टपणे सांगितली. शेवटी नाइलाजाने त्यांना हात हलवत परत फिरावे लागले. मंत्र्यांकडूनच स्पष्ट नकार मिळाल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अथवा अमित शहांकडे रदबदलीचा मुद्दाच उदभवला नाही,’ अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने स्वत:चे व ‘त्या’ दोन मंत्र्यांची नावे उघड न करण्याच्या अटीवर दिली. हा नेता कधीकाळी नितीशकुमारांचा अत्यंत निकटवर्तीय होता. त्याच्या दाव्यास अन्य सूत्रांनीही दुजोरा दिला.

‘मोदींच्या भीतीने लालू व नितीशकुमार हाडवैर विसरून एकत्र आले; पण पहिल्यापासूनच लालूंच्या लुडबुडीने नितीशकुमार नाराज आहेत. त्यांना इतरांचा हस्तक्षेप बिलकूल मान्य नसतो. लालूंच्या कुटुंबीयांच्या गरव्यवहारांची दररोज नवनवी प्रकरणे बाहेर येत असल्याने स्वप्रतिमेबाबत अतिजागरूक असलेले ‘सुशासन बाबू’ नितीशकुमारांची अस्वस्थता आणखीनच टिपेला पोचलेली आहे. दुसरीकडे आपल्याविरुद्ध नितीश व भाजपने हातमिळवणी केल्याचा दाट संशय लालूंच्या मनात आहे. सगळीकडून घेरल्याच्या भावनेतून त्यांनी थेट मोदींशी मांडवणी करण्याचा प्रयत्न केला. पण मोदींच्या मनामध्ये लालूंबद्दल असलेला तिटकारा पाहून त्या दोन्ही मंत्र्यांनी लालूंच्या दूतास स्पष्टपणे नकार दिला,’ अशीही माहिती त्याने दिली. उपमुख्यमंत्री तेजस्वी हा लालूंचा राजकीय वारस. पण नेमके त्याच्याविरुद्धच कायदेशीर बालंट येत आहेत. त्यापोटीच मोदींबद्दल कमालीचा तिरस्कार असताना नाइलाजाने त्यांनी अंतस्थ: हातमिळवणीचा प्रयत्न केला असण्याचा अंदाज त्या नेत्याने व्यक्त केला. चारा घोटाळ्यात दोषी सिद्ध झाल्याने लालूंना २०२४पर्यंत निवडणुका लढविण्यास बंदी आहे. अशी वेळ तेजस्वीवर येण्याच्या शंकेने लालू अधिक अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, रेल्वे मंत्रीपदाचा लाभ उठवून कवडीमोल किमतीने भूखंड पदरात पाडल्याप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री नितीशकुमार व लालूंप्रसादांमधील संबंध आणखी तणावग्रस्त होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाटण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, नितीशकुमार कदाचित तेजस्वी यादवांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखविण्यासारखे टोकाचे पाऊल उचलू शकतात. त्याबद्दल अधिकृत दुजोरा मिळत नसला तरी आज (शनिवार) होणाऱ्या संयुक्त जनता दलाच्या बठकीकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे. तेजस्वींविरुद्ध खरोखर कारवाई झाली तर मग बिहारमधील राजकीय समीकरणे वेगाने बदलू शकतात. नितीशकुमारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये यापूर्वीच भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा दिलेला आहे.

माझ्याविरुद्ध काय पुरावा आहे? पुरावा दाखविल्यास सांगाल त्या शिक्षेला तयार आहे. पण मी दोषी नाही. मी काहीही वाईट केलेले नाही. विरोधकांना एकत्रित आणण्याच्या माझ्या प्रयत्नांना मोदी सरकार घाबरले आहे. एकवेळ मी उद्धध्वस्त होईन; पण मोदी सरकारचा नि:पात केल्याशिवाय गप्प राहणार नाही.. -लालूप्रसाद यादव