पीटीआय शिमला
समर हिलजवळ शिवमंदिर परिसरातील ढिगाऱ्यातून आणखी एका महिलेचा मृतदेह बुधवारी बाहेर काढण्यात आला. त्यामुळे हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस व भूस्खलनामुळे मृत झालेल्यांची संख्या ५७ झाली.
हिमाचल प्रदेशात रविवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे समर हिल, कृष्णा नगर आणि फागली येथे भूस्खलन झाले. शिमलाचे उपायुक्त अदित्य नेगी यांनी सांगितले की, समर हिल आणि कृष्णाा नगरमध्ये बचाव कार्य सुरू आहे. समर हिल भागात आणखी एका महिलेचा मृतदेह सापडला आहे.
शिव मंदिर भागात सोमवारी भूस्खनन झाले होते. येथील ढिगाऱ्याखाली आणखी दहा मृतदेह गाडलेले असावेत, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. समर हिल येथे आतापर्यंत १३ मृतदेह सापडले आहेत. तर, फागली येथे पाच आणि कृष्णा नगर येथून दोन मृतदेह सापडले. कृष्णा नगर परिसरातील १० घरांतील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर, अन्य काही रहिवाशांनी मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे स्वत:हून घरे रिकामी केली. मुख्यमंत्री सुखिवदर सिंग सुखू यांनी मंगळवारी सांगितले की, मुसळधार पावसामुळे संपूर्ण हिमाचल प्रदेशात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मृतांची संख्या ५७ पेक्षा अधिक आहे.
खराब हवामानामुळे शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बुधवारी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. हिमाचल प्रदेश विद्यापीठाने १९ ऑगस्टपर्यंत शैक्षणिक कामकाल स्थगित केले आहे.
गुरुदासपूरमधील पूरग्रस्त भागात बचाव मोहीम
पोंग धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यानंतर पूरस्थिती निर्माण झालेल्या भागातील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी ‘एनडीआरएफ’ने बुधवारी बचाव मोहीम सुरू केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बियास नदीवरील पांग धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मंगळवारी पोंग धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यात आले, असे गुरुदासपूरचे उपायुक्त हिमांशू अग्रवाल यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाने या भागातील सखल भागासह नदी किनाऱ्यावरील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
जोशीमठजवळ घर कोसळून दोघांचा मृत्यू
उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यात जोशीमठजवळ हेलांग येथे एक दुमजली घर कोसळून दोघांचा मृत्यू झाला आणि इतर पाच जण जखमी झाले. मरण पावलेले दोघेही नेपाळी नागरिक होते, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. हे दुमजली घर मंगळवारी रात्री आठच्या सुमाराला कोसळले तेव्हा त्यामध्ये सात जण होते. दुर्घटनेनंतर बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले. एक जण जागेवरच मरण पावला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.