प्रवाशांना वाहतूक सुविधा देणाऱ्या खासगी ओला आणि उबर कंपनीतून मागील दोन वर्षांत हजारो चालक सोडून गेल्याचे चित्र आहे. तर याबदल्यात फारच कमी जण या कंपन्यांमध्ये रुजू झाले आहेत. सुरुवातीला चालकांना आकर्षित कऱण्यासाठी या कंपन्यांकडून इन्सेन्टिव्हज देण्यात आले. मात्र, कालांतराने नफ्यासाठी यामध्ये हळूहळू घट करण्यात आली.
मागच्या वर्षी मुंबई, दिल्ली आणि बंगळूरुमध्ये दररोज ३०० ते ३५० चालक रोज कंपनीसोबत नोंदणी करत होते. या संख्येत आता घट होऊन ती अवघ्या ४० ते ५० वर आली आहे. अशाप्रकारे गाड्यांसाठी पुरेसे चालक उपलब्ध नसल्याने सेवेत असणाऱ्या या गाड्यांच्या संख्येत घट झाल्याचे समजते.
याबाबत ‘वेलोराईजर कन्सलटंट्स’चे भागीदार जसपाल सिंह म्हणाले, सध्या नव्याने रुजू होणाऱ्या चालकांना हे माहिती आहे की, यावर्षी मागील वर्षीपेक्षा कमी पगार आणि इन्सेन्टिव्हज देण्यात येत आहेत. तरीही ते काम करायला तयार आहेत. याचे कारण म्हणजे यातील अनेक चालकांना स्वतःची गाडी खरेदी करायची आहे. याआधी महिन्याचा पगार आणि इन्सेन्टिव्हज म्हणून ६० हजार ते १ लाख रुपये मिळविणारेही अनेक चालक होते, ज्यांनी स्वतःची गाडी घेऊन व्यवसाय करण्यासाठी ही नोकरी सोडून दिली.
सध्या ओला १०२ शहरांमध्ये सुविधा पुरवत असून, ५ लाख ५० हजार चालक या कंपनीत काम करत आहेत. तर उबरशी २९ शहरांमध्ये ४ लाख चालक जोडलेले आहेत. मात्र, विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार यातील अनेक चालक हे प्रत्यक्ष कार्यरत नसून, त्यांनी केवळ नोंदणी करुन ठेवली आहे. एकीकडे चालकांची संख्या कमी झाली असली तरीही या सुविधेसाठी ग्राहकांकडून मोठी मागणी असल्याचेही विश्लेषकांचे म्हणणे आहे.