बिहारचे नेते संपूर्ण देश चालवतात. केंद्रातील अनेक महत्त्वपूर्ण खाती बिहारमधील नेत्यांकडे असल्याचे वक्तव्य शनिवारी नरेंद्र मोदींनी यांनी केले. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पटना आणि मुजफ्फरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सभांमध्ये ते बोलत होते. यावेळी मोदींनी आपल्या भाषणातून बिहारच्या जनतेला विकासाचे आश्वासन दिले. देशाचा विकास करायचा असेल तर, आपल्या सगळ्यांना मिळून राज्यांचा विकास केला पाहिजे. दिल्लीत बसून धोरणे आखायचे दिवस आता गेले. आताच्या काळात देशाच्या विकासात राज्यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. बिहारमुळे संपूर्ण देशाचा विकास जोमाने होईल, असा विश्वास मला असल्याचे यावेळी मोदींनी म्हटले. यावेळी मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका करताना विकास आणि राजकारण यांच्यात गल्लत करू नये, असे सांगितले. नितीश कुमार यांच्या राजकीय ‘डीएनए’मध्येच कमतरता असल्याचे सांगत मतदारांनी त्यांच्या राजकारणाला नाकारावे, असे आव्हान मोदींनी केले. लोकसभा निवडणुकीच्यावेळी मोदींच्या नेतृत्वाला विरोध करत नितीश कुमार राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडले होते.
दरम्यान, बिहारला ५०,००० कोटींचे विशेष आर्थिक पॅकेज मिळवून देण्यासाठी मी पावसाळी अधिवेशनानंतर स्वत:हून प्रयत्न करेन असे, आश्वासन मोदींनी मुजफ्फरपूर येथील सभेत दिले. बिहारमध्ये २४ तास वीज, गॅस पाईपलाईन असतील, तो दिवस फार दूर नाही. तुमच्याकडे वीजच नसेल तर, तुम्ही तुमचे मोबाईल फोन कसे चार्ज करणार, ‘क्योंकि सास भी कभी बहूँ थी’ ही मालिका कशी बघणार, असा सवाल मोदींनी उपस्थित जनतेला विचारला. दरम्यान, बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी भाजपकडून अजूनपर्यंत मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा हेच चेहरे बिहारमधील प्रचाराच्या केंद्रस्थानी असतील, अशी अटकळ बांधली जात आहे.